‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला

By Admin | Updated: September 22, 2016 00:14 IST2016-09-22T00:14:37+5:302016-09-22T00:14:37+5:30

स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवर लाईननजिकच्या नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले अंदाजे १० ट्रक लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाळला आहे.

The 'third day' for the 'raid' | ‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला

‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला

४३ वृक्ष कापण्याची परवानगी : घटनास्थळी वृक्ष गोलाईचे करणार निरीक्षण
अमरावती: स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवर लाईननजिकच्या नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले अंदाजे १० ट्रक लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाळला आहे. तरी देखील लाकूड मोजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. अखेर बुधवारी लाकूड मोजणीसाठी वनविभागाने अतिरिक्त चमू नियुक्त केली आहे. या अवैध लाकडाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले लाकूड हे येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील ४३ वृक्ष कटाईचे आहेत. सदर अरागिरणी मालकाने ४३ वृक्ष कापण्याची परवानगी देखील वनाधिकाऱ्यांना सादर केल्याचा दावा वनविभागाने केला आहे. मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय वारे यांनी डफरीन रुग्णालयातून वृक्ष तोडण्याला परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले लाकूड नेमके कुठून आणल्या गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही. एका आरागिरणीत ८ ते १० ट्रक अवैध लाकूड आणल्या जात असताना शहरातील अन्य आरागिरण्यांमध्ये किती अवैध लाकूड साठवून ठेवण्यात आले, यापासून वनविभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे आरागिरणी वनपालांनी आतापर्यत कोणते कर्तव्य बजावले हे देखील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना तपासणे गरजेचे आहे. आरागिरणी परिसरात अवैध १० ट्रक लाकूड आणून साठविले जात असताना सदर वनपालांना ही माहिती का मिळू नये? हा विषय संशोधनाचा आहे. आरागिरणीचा मलईदार कारभार मिळावा, यासाठी ‘खटाटोप’ करणाऱ्या वनपालांनी दोन महिन्यांपासून आरागिरण्यांची तपासणी केली काय? हे वरिष्ठांनी स्टॉक रजिस्टर तपासल्यास बरेच सत्य समोर येईल. आरागिरणी मालक शहराबाहेरुन मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड आणत असल्याचे नवदुर्गा आरागिरणीत आढळलेल्या लाकडावरुन स्पष्ट होते.

आदेश एक, वृक्षतोड अनेक
आरागिरणी मालकांवर वनविभागाचे अंकुश नसल्यामुळे ग्रामीण भागातून शहरातील आरागिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीचे लाकूड आणले जात आहे. जुने वृक्षतोड आदेशाचा वापर करुन आरागिरणीत लाकूड आणण्याचा सिलसिला सुरु आहे. ट्रकवर ताडपत्री झाकून अवैध लाकूड आणले जात असताना वनविभाग कारवाई का करीत नाही? याची दखल वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

मार्च महिन्यात परवानगीचे लाकूड सप्टेंबरमध्ये आले कसे?
नवदुर्गा आरागिरणीत १० ट्रक आढळलेल्या लाक डाला नियमानुसार परवानगी असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. डफरीन परिसरात नवीन बांधकामात अडसर ठरणारे ४७ वृक्षाचे मुल्यांकन ‘बी अँन्ड सी’ने काढले होते. नियमांची पुर्तता करुन मार्च २०१६ मध्ये ४३ वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली. मात्र मार्च महिन्यात वृक्षतोड परवानगीचे लाकूड सहा महिन्यांनंतर सप्टेंबर महिन्यात आले कसे? हा चिंतनाचा विषय आहे.

वृक्षतोड आदेश असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. डफरीनमधील वृक्ष तोडण्यात आले त्याची गोलाई तपासली जाईल. आरागिरणी मालकाला अभय मिळणार नाही, अशी नियमानुसार कारवाई करु.
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर
वनक्षेत्राधिकारी, वडाळी

Web Title: The 'third day' for the 'raid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.