तिसऱ्या दिवशीही कचरा धगधगतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:52 IST2018-10-10T21:51:40+5:302018-10-10T21:52:04+5:30
भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.

तिसऱ्या दिवशीही कचरा धगधगतोय!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.
सुकळी वनारसी कंपोस्ट डेपोत शहरातील संपूर्ण कचरा टाकला जातो. आता कचऱ्याचा ढीग शंभर ते दोनशे फुटांवर पोहोचला असून, त्याचा छोटेखानी डोंगरच तयार झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अद्याप स्थानिक प्रशासनाला यश मिळालेले नाही. या कचरा डेपोत सोमवारी आग लागली. आगीने हळूहळू भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आसमंतात पसरल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. अग्निशमन पथकाने सोमवारी प्रथम तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात आली नाही. मंगळवारीसुद्धा पाण्याचा मारा सुरूच ठेवला. बुधवारी आगीचा तिसरा दिवस उजाडला तरी अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत २१ बंब रिते झाले आहेत.
आगीलाही प्लास्टिकची बाधा
कचरा डेपोत सर्वाधिक प्लास्टिक फेकले जात असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक अधिक आहे. प्लास्टिकमुळे आग नियंत्रणात आणण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. कचऱ्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक पन्नीमुळे पाणी खोलवर धुमसत असलेल्या आगीपर्यंत पोहोतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाने महापालिका उपायुक्त वानखडे यांच्याशी संपर्क केला. आता जेसीबीने कचरा उलथवून आगीवर पाण्याचा मारा केला जाणार आहे, जेणेकरून कचºयाच्या तळापर्यंत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात येईल.