-आता चोरट्यांचे लक्ष्य दागिने आणि मोबाईल !
By Admin | Updated: November 16, 2016 00:11 IST2016-11-16T00:11:55+5:302016-11-16T00:11:55+5:30
पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत.

-आता चोरट्यांचे लक्ष्य दागिने आणि मोबाईल !
चोरांचा नवा फंडा : पाचशे-हजारांच्या नोटांकडे पाठ
अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत. याचा अर्थ चोरीच्या घटना कमी झाल्यात असे नाही तर आता चोरटे दागिने आणि मोबाईलला लक्ष्य करीत आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये दागिन्यांसह मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांमध्ये आयुक्तालय क्षेत्रातील चोरीच्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते.
दोन दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १.८८ लाखांच्या धाडसी घरफोडीतही चोरट्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण देश एका वेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या धक्कातंत्राने एकीकडे संपूर्ण देश हादरला असताना चोरटेही सतर्क झाले आहेत. आतापर्यंत चोरटेकेवळ रोकडच लंपास करीत होते. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चोरल्यानंतर त्याबँकेत नेऊन बदलायच्या कशा, असा प्रश्न चोरट्यांना कदाचित पडला असावा आणि त्यामुळेच की काय, त्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागदागिन्यांना लक्ष्य केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या ‘डेली क्राईम रिपोर्ट’मधून ही बाब उघड झाली. या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनीही घरात नोटा ठेवणे बंद करणे, हे यामागचे एक कारण असू शकते. शहरातील बहुंताश नागरिक सध्या नोटा बँकेत जमा करण्यात व एक्सचेंज करण्यात मग्न आहेत. अनेक जण घराला कुलूप लाऊन नोटा जमा करण्यासाठी जात आहेत. यासंधीचा लाभ घेऊन चोरट्यांनी शहरात डझनावर चोऱ्या केल्या आहेत.