समृद्धी महामार्गावर चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST2020-12-12T04:29:58+5:302020-12-12T04:29:58+5:30
धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाच्या बांधकामांवरील डिझेल, टायर, लोखंड चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली असून, आतापर्यंत दोन ...

समृद्धी महामार्गावर चोरांचा धुमाकूळ
धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाच्या बांधकामांवरील डिझेल, टायर, लोखंड चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली असून, आतापर्यंत दोन हजार लिटर डिझेल चोरांनी चोरून नेले आहे. या गंभीर बाबीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांतून ७२ किलोमीटर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. तळेगाव दशासर परिसरात येणाऱ्या घुईखेड, तळेगाव दशासर, सुलतानपूर, धोत्रा, टिटवा, मोगरा या परिसरातून दररोज रात्रीला उभ्या वाहनातून डिझेल चोरी होत आहे. आठ महिन्यांत वाहनातून तब्बल २ हजार लिटर डिझेल चोरी गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी सुलतानपूर परिसरातील कॅम्पमधून तब्बल एक लाख रुपयांचे टायर चोरीला गेले आहेत. या परिसरातील कामावरील लोखंड रात्रीला चोरीला जात आहे. आतापर्यंत एनसीसी कंपनीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात तीन तक्रारी नोंदविल्या आहेत. एकीकडे रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असताना दुसरीकडे रस्त्यावरील लोखंड चोरीला जात आहे. या बाबीची पोलिसांनी दखल न घेतल्यास राज्याच्या गृह विभागाकडे यासंदर्भातील तक्रार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे एनसीसी कंपनीचे जनरल मॅनेजर नीरज कुमार यांनी लोकमतला सांगितले.