चोर उठले जिवावर, 'सीपी' तरीही मेहेरबान अधिकाऱ्यांवर!
By Admin | Updated: June 21, 2014 01:16 IST2014-06-21T01:16:20+5:302014-06-21T01:16:20+5:30
घरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत.

चोर उठले जिवावर, 'सीपी' तरीही मेहेरबान अधिकाऱ्यांवर!
गणेश देशमुख अमरावती
घरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत. सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला तरीही का मेहरबान आहेत, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
शहरातील फरशी स्टॉप भागात गुरुवारी दिवसाढवळ्या एका वृद्धेचा गळा आवळून चोरांनी घरातून दागिने लूटून नेलेत. आतापर्यंत घरे फोडून चोरी करणारे चोरटे नागरिकांच्या प्राणांवर उठले आहेत. पोलीस आयुक्तांनी वेशांतर करून फिरण्याची अपेक्षा जनतेची असताना आता चोरच वेशांतर करून अधिक गंभीर गुन्हे करीत फिरू लागले आहेत. गुरुवारच्या घटनेत चोर बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून राजरोसपणे घरात शिरले. घरातील माणसांचा राबता लक्षात घेतला. संधी साधून चहापाणी करणाऱ्या सवितार्इंवरच हल्ला केला. लूटमार करून ते पसार झाले. पोलीस तमाम अधिकाऱ्यांच्या तुलनेत सतत तल्लखपणा दाखविणाऱ्या या चोरांनी यावेळीही चोरीच्या बदलविलेल्या पद्धतीतून स्वत: पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे शिक्कामोर्तब केले.
हे तर हत्यारेच !
सविता पांढरीकर चोरांच्या हल्यात बेशुद्ध झाल्या असल्या तरी, खरे तर चोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाच केला होता. त्या मृत झाल्याचे समजूनच चोरांनी त्यांच्या अंगावरील सुमारे ६० ग्रॅम सोने लूटून नेले. 'काळ आला होता; पण वेळ आली नसल्या'ने वृद्ध सवितातार्इंचा जीव वाचला. घरात शिरून दिवसाढवळ्या नागरिकांना ठार मारण्याचा जो इरादा चोरांचा होता, तो बघता अमरावतीकर पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. आदीदास शोरूममधील चोरीप्रकरणी आणि गुरुवारी रात्री विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी अमरावती पोलिसांनी उत्तम आणि वेगवान तपासकार्य केले. त्यासाठी पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी. त्याचवेळी पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारांना भय वाटेनासे झाले, हे जळजळीत वास्तव पुन्हा एकदा ठळपणे समोर आल्याची आठवणही त्यांना करून द्यावीशी वाटते. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत गंभीर गुन्हे घडत आहेत, पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी, ही लोकभावना आहे. नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा नाही, हा संदेश देऊन आयुक्तांनी लोकभावनेचा आदर का करू नये?