‘ते’ चार संकुल ताब्यात घेणार
By Admin | Updated: June 6, 2015 01:17 IST2015-06-06T01:17:19+5:302015-06-06T01:17:19+5:30
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात

‘ते’ चार संकुल ताब्यात घेणार
बीओटी कंत्राटदाराची मुस्कटदाबी : आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली
अमरावती : बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. बीओटी कंत्राटदारांनी चालविलेल्या नियमबाह्य कामांना लगाम लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने येत्या आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू आहे.
स्थानिक जवाहर गेटनजीकचे खत्री कॉम्प्लेक्स, महापालिका इमारत परिसरातील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व दादासाहेब खापर्डे संकुल तर जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे संकुल महापालिका प्रशासनाने बीओटीवर साकारले असून या चारही संकुलांचे करारनामे हे सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे; तथापि दादासाहेब खापर्डे व खत्री कॉम्प्लेक्सच्या बीओटी कंत्राटदाराने प्रशासनाला विश्वासात न घेता काही गाळेधारकांशी परस्पर करारनामे केल्याचे बाजार व परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असताना कंत्राटदारांनी परस्पर करारनामे करुन लाखो रुपयांना गाळे विकण्याचा सपाटा चालविला आहे.
याप्रकरणी उपायुक्त चंदन पाटील हे लक्ष ठेवून आहेत. परंतु महापालिका उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने या चारही संकुलाचे करार संपण्यापूर्वीच ते ताब्यात घेण्यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करणे आवश्यक आहे.
गाळे वाटपासाठी काढणार निविदा
४बीओटी तत्त्वावरील हे चारही संकुल ताब्यात घेतल्यानंतर महापालिका या संकुलात गाळे वाटपासाठी खुल्या निविदा काढून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये गाळे वाटप निविदामधून येतील. तसेच या संकुलात होत असलेल्या गैरव्यवहाराला आळादेखील बसवता येईल.
ही आहेत बीओटीची चार संकु ले
४सन २०१८ मध्ये बीओेटी तत्त्वावरील करारनामे संपणारी ही चार संकुले आहेत. यात खत्री कॉम्प्लेक्स, प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुल, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस संकुल व दादासाहेब खापर्डे संकुलाचा समावेश आहे.
जुन्या करारनाम्यानुसार अटी, शर्थीचे उल्लंघन झाल्यास संकुल करार संपण्यापूर्वी ताब्यात घेता येते. सर्वसाधारण सभा, आयुक्तांची मान्यता आवश्यक राहील. सद्या या विषयी काही बोलणे संयुक्तिक नाही.
- चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.
बीओटी संकुलात उघडकीस आलेल्या गैरव्यवहाराने प्रशासनाची नामुष्की झाली आहे. या चार संकुलाचे करारानामे संपायला दोन ते अडीच वर्षे शिल्लक आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी निर्णय योग्य राहील.
- विलास इंगोले, सभापती, स्थायी समिती.
करार संपण्यापूर्वी गाळेधारकांना संकुलातून बाहेर काढणे योग्य नाही. नव्याने अटी, शर्थी लादून त्याच दुकानदारांना न्याय मिळावा, असे धोरण निश्चित करावे. अन्यथा न्यायालयात धाव घेऊ.
- अजय मिराणी, गाळेधारक.