They stay in quarantine and clean the school | क्वारंटाईन राहून ‘ते’ करताहेत शाळेची स्वच्छता

क्वारंटाईन राहून ‘ते’ करताहेत शाळेची स्वच्छता

ठळक मुद्देतेलखारच्या शाळेत निवास : आदिवासी विद्यार्थ्यांचा असाही आदर्श

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : लॉकडाऊनमध्ये मुंबई पुण्याहून मेळघाटातील तेलखार येथे स्वगृही आलेल्या कामगारांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. या आठ आदिवासी युवकांनी कुठल्याच प्रकारची तक्रार न करता स्वत:हून आपल्या शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
ज्या शाळेत बालपणी शिक्षण घेतले. त्याच शाळेत पुन्हा यावे लागेल व काही दिवस मुक्कामी राहावे लागेल, असा विचारही न करणाऱ्या त्या आदिवासी तरूणांनी क्वारंटाईन हसतमुखाने स्वीकारले. त्या आठ माजी विद्यार्थ्यांनी तेथे स्वस्थ न बसता आपल्या शाळेच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. सतीश बेलसरे, रवींद्र बेलसरे, विशाल जामुनकर, लक्ष्मण दिवाकर, नारायण हेकडे, अक्षय हेकडे, अर्जुन मरस्कोल्हे, तिलकराम बारसकर, अशी या माजी विद्यार्थी तथा मुंबई पुण्याहून आलेल्या कामगारांची नावे आहेत. क्वारंटाईन ठिकाणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात असताना या आदिवासी विद्यार्थी वजा कामगारांनी कुठल्याच प्रकारे प्रशासनाची तक्रार न करता उलट त्यांच्याप्रती सहकार्याची भावना ठेवत वेगळा संदेश दिला आहे.

प्रशासनाचे सहकार्य
शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याच गावकऱ्यांना नीटनेटके आणि स्वच्छ वातावरण मिळेल, त्या उद्देशाने ही मोहीम राबविली गेली. उन्हाळ्याचा दिवसांत शाळा व परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. चिखलदऱ्यांच्या तहसीलदार माया माने यांनी त्यांचे कौतुक केले. सरपंच अनिता बेलसरे, उपसरपंच राजू मोरे, सचिव रवींद्र मोहोड, पोलीस पाटील सुमरिता ठाकरे, शिक्षक सोहन कासट, आशा वर्कर मीरा राणे, बेबी मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, आदींचेसुद्धा त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे.

Web Title: They stay in quarantine and clean the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.