कल्पक प्रयोगातून ‘त्यांना’ मिळाले आत्मभान
By Admin | Updated: October 19, 2015 00:29 IST2015-10-19T00:29:10+5:302015-10-19T00:29:10+5:30
आयुष्य नेमके किती दिवसांचे, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण, ‘एचआयव्ही’सारख्या गंभीर व्हायरसमुळे आपला मृत्यू समिप आलाय, ...

कल्पक प्रयोगातून ‘त्यांना’ मिळाले आत्मभान
प्रदीप भाकरे अमरावती
आयुष्य नेमके किती दिवसांचे, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण, ‘एचआयव्ही’सारख्या गंभीर व्हायरसमुळे आपला मृत्यू समिप आलाय, हे माहिती असूनही त्यांच्यापैकी अनेकांनी एकत्र येऊन सुरू केलेली जगण्याची धडपड आज यशस्वी ठरतेय. या धडपडीतून त्यांनी माळरान फुलविले आहे. मक्त्यावर शेती घेऊन ‘ते’ मागील ४ वर्षांपासून सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. उर्वरित आयुष्यात अधिकाधिक ‘जगण्याचा’ त्यांचा प्रयत्न धडधाकट नागरिकांना प्रेरणा देणारा आहे. एचायव्ही संक्रमितांकडून करण्यात येत असलेला सामूहिक शेतीचा प्रयोग महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. या प्रयोगातून त्यांना जगण्याचे आत्मभान मिळाले आहे.
सन २००६ मध्ये एचआयव्ही संक्रमित महिला-पुरुषांचाच समावेश असलेली ‘आधार’ संस्था जन्माला आली. संस्थेच्या अधिपत्याखाली सुमारे २५०० एचआयव्ही संक्रमित व्यक्ती एकत्र आले. त्यांना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात दिला आणि त्यातून १३ बचतगट निर्माण झालेत.
एचआयव्ही संक्रमितांचा
सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग
बँकांनी अव्हेरले होते
जिल्हा प्रशासन, डापकू व आधार संस्थेच्या मार्गदर्शनात एचआयव्ही संक्रमितांचे बचतगट स्थापन झाले. मात्र, त्यांना कर्ज कोण देणार, हा प्रश्न उभा ठाकला. जिल्ह्यातील अनेक बँकानी अव्हेरले. प्रचंड पायपीट आणि मन:स्ताप झाल्यानंतर अखेर विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँक समोर आली. या बँकेने त्यांना कर्जरुपी आधार दिला व बचतगट खऱ्या अर्थाने सुरू झाले, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली.
एचआयव्हीबाधितांना बचत गटांचा आधार
एचआयव्ही संक्रमित महिला आणि पुरुषांचे बचत गट तयार करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने (डापकू) सुरू केला आहे. डापकूच्या मार्गदर्शनात सन २००६ पासून आधार बहुउद्देशीय संस्थेने १३ बचतगट निर्माण केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या संस्थेशी जुळलेल्या जिल्ह्यातील २५०० पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमितांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागला आहे. त्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात आलेत. आता बचत गटातर्फे एचआयव्ही संक्रमित व्यक्तिंना सहजीवनासाठी प्रेरित करण्यात येणार आहे.