चांदूर बाजार : पावसाच्या आगमनावर मूर्तिकारांचे आर्थिक गणित अवलंबून असते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर वरुणराजाचे आगमन झाले आणि आता मूर्तिकार मातीला देवत्वाचा आकार देण्याच्या दृष्टीने सज्ज झाले आहेत.
जिल्ह्यात जिवती सणापासून खऱ्या अर्थाने सुरू होणाऱ्या मूर्ती निर्मितीचा व्यवसाय शारदोत्सवापर्यंत बहरत असतो. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेल्या साहित्याच्या किमतीची झळ मूर्तिकारांसोबतच भाविकांना सोसावी लागणार असल्याचे चिन्ह आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपली असल्याने लहान- मोठ्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आलेला आहे. मूर्तिकारांची प्राथमिक तयारी जोरात सुरू आहे. मूर्ती निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरात येणारे साहित्य माती, भुसा, लाकूड, बांबू, लोखंडी अँगल, रंग आदींच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमती प्रतिबॅग १८५ रुपयांवरून २०० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, तर काट्या- बंडलचा दर ९०० ते १ हजार रुपयांपासून थेट १,५०० ते १,७०० रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. मूर्ती निर्मितीकरिता वापरात येणारी गाळाची माती प्रामुख्याने शहराबाहेरून आयात करण्यात येते. वाढत्या किमतीसोबत मजुरी वाढल्याने यंदा मूर्तीचे भाव २० ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक असल्या तरी सध्या इको फ्रेंडली असलेल्या मातीच्या मूर्तींकडे नागरिकांचा विशेषकरून कल आहे.
००००००००००००००००००००००
यंदा बुकिंग नाही
तालुक्यातील शिरजगाव बंड येथील रोतळे कुटुंबातील सदस्यांतर्फे दरवर्षी शेकडो गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात गणेशमूर्तींची बुकिंग होते. यंदा मात्र जुलै महिना संपत आला असतानाही गणेशमूर्तींची मागणी अद्यापही न झाल्याने त्यांचा व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे.
----------
बाल गणेश मंडळांची राहणार धूम
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र शाळा- महाविद्यालये बंद आहेत. यात शासनाने गणेशमूर्तीची उंची ठरवून दिल्याने यंदा मोठ्या मूर्तींची मागणी मंडळातर्फे अत्यंत कमी राहणार आहे. अशात चिमुकल्यांनासुद्धा गणेशोत्सव हा आवडता सण असल्याने यंदा बाल गणेश मंडळांची संख्या वाढणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.