‘ते’ मांस गोवंशाचे निघाले
By Admin | Updated: April 2, 2016 00:15 IST2016-04-02T00:15:40+5:302016-04-02T00:15:40+5:30
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदरपुरा येथून १७ फेब्रुवारी २०१६ रोजी जप्त करण्यात आलेले ७,५०० किलो मांस हे गोवंशाचे असल्याबाबतचा ..

‘ते’ मांस गोवंशाचे निघाले
१३ नमुन्यांची तपासणी : विभागीय विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदरपुरा येथून १७ फेब्रुवारी २०१६ रोजी जप्त करण्यात आलेले ७,५०० किलो मांस हे गोवंशाचे असल्याबाबतचा अहवाल येथील विभागीय विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आता महापालिका व पोलीस प्रशासनाला आरोपींविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कारवाईचा मार्ग सुकर झाला आहे.
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंदे्र यांनी पोलीस बंदोबस्तात ७,५०० किलो मांस ताब्यात घेण्याची कारवाई केली होती. मुस्लिम बहुल भागात गोवंशाची हत्या करुन मांस बाहेरगावी पाठविले जात असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापडा रचून एम. एच. ३७ जे ६१३ हे वाहन तपासले असता त्यात प्लास्टिक ड्रममध्ये मांस असल्याचे दिसून आले होते. मात्र हे मांस कोणत्या पशुंचे? हे तपासण्याकरीता पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानुसार महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मांसाचे १३ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले होते. उर्वरित मांस हे कम्पोस्ट डेपोत छायाचित्रात पुरविण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र सदर मांस हे गोवंशाचे असल्याचा संशय व्यक्त करुन सचिन बोंद्रे यांनी अनधिकृत कत्तल करणे, विनापरवानगी मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी सुधारित गोवंश हत्याबंदी कायदा, प्राणी सुरक्षा अधिनियम, प्राणी कु्र रता अधिनियम अन्वये नागपुरी गेट पोलिसात ००६४/२०१६ नुसार प्राथमिक गुन्हा नोंदविला होता. गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार ठोस कारवाई करण्यापूर्वी हे मांस गोवंशाचे आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने आयुक्त गुडेवारांच्या आदेशानुसार मांसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. या मांसाच्या नमुन्याचा अहवाल २६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला. विभागीय विज्ञान प्रयोगशाळेचे सहायक तज्ज्ञ अधिकारी एम. जी. कांबळे यांनी मांसाचे नमुने हे गोवंशाचे असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. (प्रतिनिधी)
अहवालामुळे होणार कारवाई
७,५०० किलो मांस जप्त करण्यात आल्यानंतर ते मांस कशाचे? हे शोधून काढण्यासाठी विभागीय विज्ञान प्रयोगशाळेत मांसाचे नमुने तपासणी करीता पाठविले. अखेर अहवाल गोवंशाचे मांस असल्याबाबत स्पष्ट झाला. आता आरोपींना कारवाई करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
मांस ताब्यात घेण्याची कारवाई ही छायाचित्रणात करण्यात आली. मांसाचे नमुने ताब्यात घेवून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
- सचिन बोंद्रे, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका.