‘ते’ अवैध सावकार दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:43+5:302021-06-11T04:09:43+5:30
४ लाखाच्या शेती गहाण प्रकरण धामणगाव रेल्वे : अल्प किमतीत शेती गहाण करून ती दुसऱ्याला तब्बल ११ लाख ...

‘ते’ अवैध सावकार दोषी
४ लाखाच्या शेती गहाण प्रकरण
धामणगाव रेल्वे : अल्प किमतीत शेती गहाण करून ती दुसऱ्याला तब्बल ११ लाख रुपयांत विकण्याच्या प्रकरणात अवैध सावकार दोषी असल्याचा निर्णय सहाय्यक निबंधक कार्यालयाने दिला आहे. हा व्यवहार अवैध सावकारी पद्धतीने झाला असल्याचे समोर आले आहे.
जळका पटाचे येथील वैशाली विनोद ठाकरे यांचे मौजा नागापूर शिवारात गट क्रमांक २७ मधील ०.८६ व विनोद उत्तमराव ठाकरे यांच्या नावाने असलेली गट क्र. २८ मधील ०.८४ हेक्टर शेतजमीन या पती-पत्नीने धामणगाव शहरातील संजय रमेश भैया याच्याकडे चार लाखात गहाण ठेवली होती. सदर शेती ही संजय भैय्या याने सविता राजेंद्र ठोंबरे यांना ११ लाख रुपये किमतीत परस्पर विकली. आपल्याकडून अल्प किमतीत चक्रवाढ व्याज लावून शेतजमीन हडपली तसेच अनेक जणांच्या जमिनी या अवैध सावकाराने हडपल्या असल्याची तक्रार वैशाली ठाकरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. याशिवाय दिवाणी न्यायालयात न्यायासाठी अपील दाखल केले होते.
तब्बल सात खरेदीपत्रे आढळली
जिल्हा उपनिबंधकांनी वैशाली ठाकरे यांच्या तक्रारीची दखल घेत २० फेब्रुवारी २०२० रोजी संजय भैया यांच्या घरी विविध पथकांकडून बी.एस. पारिसे, शिल्पा कोल्हे, सी.एस. पुरी, आशिष गुल्हाने यांच्या नेतृत्वात धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या घरी व दुकानात टाकलेल्या धाडीत झडती घेतली असता, घरातील खालच्या मजल्यावर व असलेल्या किराणा दुकानातून तसेच बेडरूमच्या खोलीमधून तब्बल सात खरेदी-विक्रीचे दस्तावेज व अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली.
अवैध सावकारी स्पष्ट
सदर प्रकरण सहायक निबंधक राजेंद्र मदारे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होते. त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली तसेच वैशाली ठाकरे व विनोद ठाकरे यांच्या शेतीच्या गहाण व खरेदीबाबत सखोल चौकशी केली. अर्जदार, गैरअर्जदार अर्जदार यांचे बयाण नोंदविले असता, यात संजय भैया व अन्य दोघे दोषी आढळून आले. हा अवैध सावकारीचा व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा सोळा पानांच्या तपासणीचा निकाल सहायक निबंधक राजेंद्र मदारे यांनी दिला आहे.