सराईत अवैध दारू विक्रेते होणार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:09 IST2016-10-24T00:09:49+5:302016-10-24T00:09:49+5:30
आॅक्टोबर महिन्यांच्या प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी सप्ताह राबवून अवैध दारू, बनावट दारू विक्रीविरुद्ध मोहीम राबविली.

सराईत अवैध दारू विक्रेते होणार तडीपार
एक्साईजचा पुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती : आॅक्टोबर महिन्यांच्या प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी सप्ताह राबवून अवैध दारू, बनावट दारू विक्रीविरुद्ध मोहीम राबविली. मात्र आता सराईत अवैध दारू विक्री, निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांची यादी तयार करण्यात आली आहे. कारवाईसाठी ती शासनाकडे पाठविली जाणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार परवानाधारक मद्य विक्रेत्यांनाच दारू विक्री करता येते. मात्र रात्री १० ते सकाळी १० या कालावधीत अनेक ठिकाणी देशी, विदेशी अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांंच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना दारूचा पुरवठा करणाऱ्या परवानाधारक दारू विक्रेत्यांचा एक्साईज विभाग कसून शोध घेत आहे. सराईत अवैध दारू विक्री करणारे अथवा गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र भरून घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने एक्साईजचे निरीक्षक कामाला लागले आहे. वारंवार नोटीस बजावणे, अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी सराईत अवैध दारू विक्रेत्यांना आता गावातूनच हद्दपार करण्याची प्रशासनाने रणनीती आखली आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पुढाकार घेतला आहे. अवैध दारू विक्रे त्यांवर कलम ९३ प्रमाणे कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई जुजबी असल्याने अवैध दारू विक्रेत्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याची बाब एक्साईजच्या लक्षात आली आहे. अवैध दारु विक्री रोखण्यासाठी एक्साईजने कृती आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत अवैध दारू विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आधार घेत जिल्हाभरातील तशा दारू विक्रेत्यांची तडीपार करण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. अवैध दारू विक्रेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील प्रस्तावात जोडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० ते २५ सराईत अवैध दारू विक्रेत्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. यात दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील दोन बियर शॉपीवर तक्रारीनुसार विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
मद्य सेवनासाठी परवाने आवश्यक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार मद्य सेवन करण्यासाठी परवाने अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मद्य सेवनाचे परवाने सहजतेने उपलब्ध व्हावे, यासाठी एक्साईज कार्यालयात एक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. मद्य पिणाऱ्या एका व्यक्तिला दरदिवशी देशी दारू दोन रुपये, तर विदेशी दारुसाठी पाच रुपये परवान्यासाठी मोजावे लागणार आहेत. मोर्शी, अचलपूर व अमरावती येथील एक्साईजच्या कार्यालयात परवाने उपलब्ध असल्याची माहिती आहे.
दारू विक्री ही शासन नियमावलीनुसार झाली पाहिजे. अवैध दारु विक्री, बनावट दारु विक्रीे रोखण्यासाठी एक्साईज विभाग कार्यरत आहे. त्यानुसार अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तडीपारीचा प्रस्ताव आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
- प्रमोद सोनोने,
अधीक्षक, एक्साईज अमरावती