पोलिस पथकाच्या हाती एमपीतही लागले घबाड; मान्यता नसलेल्या रासायनिक खतांची महाराष्ट्रात विक्री
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 21, 2023 18:06 IST2023-08-21T18:05:27+5:302023-08-21T18:06:50+5:30
पहिले पथक सोमवारी जबलपूरला पोहोचले व त्यांनी एका कंपनीची पाहणी केली व खतांच्या उत्पादनासंदर्भात माहिती घेतली.

पोलिस पथकाच्या हाती एमपीतही लागले घबाड; मान्यता नसलेल्या रासायनिक खतांची महाराष्ट्रात विक्री
अमरावती : माहुली येथील २.३९ कोटींच्या अनधिकृत रासायनिक खत प्रकरणाची व्याप्ती आता राज्याबाहेरही वाढली आहे. याप्रकरणी पोलिसांचे एक पथक जबलपूर येथील एका खत कंपनीची पडताळणी करण्यास गेलेले आहे. तेथे देखील मध्यप्रदेशात मान्यता नसलेल्या खतांचा साठा आढळून आलेला आहे. याच खतांचा साठा माहुली येथील गोदामातही आढळून आलेला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी एसडीपीओ सुर्यकांत जगदाळे यांना तपास अधिकारी नियुक्त करुन पाच अधिकारी व २० पोलिस अंंमलदारांचे चार पथक गठित केले आहे. पहिले पथक सोमवारी जबलपूरला पोहोचले व त्यांनी एका कंपनीची पाहणी केली व खतांच्या उत्पादनासंदर्भात माहिती घेतली. दरम्यान पथकाद्वारा कंपनीच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये कंपनीची नोंदणीसह, रासायनिक खतांची मान्यता, राज्यात विक्रीची परवानगी, साठवणूक परवाना यासह कंपनीचा परवाना आदी कागदपत्रांची पाहणी करण्यात येत असल्याचे तपास यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.