श्रीक्षेत्र झुंज येथे अद्यापही नाही सुरक्षा व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:01+5:302021-09-24T04:14:01+5:30
पुरातन शिवलिंग व महानुभवांची समाधी असल्याने श्रावण मास, महाशिवरात्रीला भाविकांची येथे वर्धा नदीपात्रालगत मोठी गर्दी असते. जून ते डिसेंबर ...

श्रीक्षेत्र झुंज येथे अद्यापही नाही सुरक्षा व्यवस्था
पुरातन शिवलिंग व महानुभवांची समाधी असल्याने श्रावण मास, महाशिवरात्रीला भाविकांची येथे वर्धा नदीपात्रालगत मोठी गर्दी असते. जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरिता धबधबे पाहण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी असते, शिवाय वर्धा नदीचा २०० फूट रुंदीचा पसारा आहे. नदीतील पाण्याची खोली ३० ते ३५ फूट आहे. पर्यटकांना धबधब्याजवळ सहज जाता येते. कुणी पोहण्याचा तर कुणी सेल्फीचा आनंद घेतात. येथे अप्रिय घटना सदोदित घडत असतात. शिवमंदिराच्या बाजूची कडा खचलेल्या आहेत. यामुळे निदान श्रावण महिन्यात, ज्यावेळी नदी दुथडी भरून वाहत असते, येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मासेमार डोंग्याचा वापर करून नदीत मासेमारी करतात आणि डोंगा बांधून निघून जातात. या हलगर्जीची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
-----------------
पंढरी मध्यम प्रकल्पावर गर्दी, प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी - A - A
पुसला : नजीकच्या पंढरी मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जलाशय बघण्याकरीता तालुक्यातील नागरिकांची गर्दी वाढली. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही. श्रीक्षेत्र झुंज येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून येथे प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वरूड तालुक्यातील वर्धाडायव्हर्शन अंतर्गत येणाऱ्या पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, गेट लागण्याच्या प्रतीक्षेत आहे. सतत पावसाने या प्रकल्पात अथांग जलाशय साचल्याने प्रकल्प बघण्याकरिता नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. या प्रकल्पात शेतजमिनी गेल्याने काही ठिकाणी विहिरी आहेत. त्यावर पाणी भरल्याने अशा ठिकाणी पोहणाऱ्यांना खोलीचा अंदाज येत नाही. पर्यटक प्रकल्पाच्या भिंतीवर चढून हा जलाशय न्याहाळतात. परंतु या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने पर्यटकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.