- तर कायदा हातात घेऊ
By Admin | Updated: December 15, 2014 22:47 IST2014-12-15T22:47:07+5:302014-12-15T22:47:07+5:30
स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि

- तर कायदा हातात घेऊ
वडाळीतील दारु दुकानाचा प्रश्न : महिलांची एक्साईज, कलेक्टररेटवर धाव
अमरावती : स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी पुन्हा मतदान घेतले तर कायदा हातात घेऊ, असा इशारा देखील महिलांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा, सुव्यवस्थेबाबत न्यायालयात वस्तुस्थिती कळविली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांचा आक्रोश कमी झाला, हे विशेष.
मतदान मलाही नकोच- जिल्हाधिकारी
सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कक्षात झालेल्या चर्चेदरम्यान वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत मलाही मतदान प्रक्रिया नको आहे, अशी प्राजंळ कबुली जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलक महिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिली. येत्या दोन दिवसांत उच्च न्यायालयाला पत्र पाठवून मतदान नव्हे तर हे दुकान अन्य ठिकाणी हलविण्याचे कळविले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन, महिलांची भूमिका न्यायालयाला कळविली जाणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हे उपस्थित होते.
एक्साईजच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
आंदोलक महिलांनी येथील एक्साईजचे कार्यालय गाठताच निरिक्षक एस.जे. ठाकूर यांना काळे फासण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मात्र ही बाब ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांशी बोलायचे आहे, असे सांगून कसेबसे दालनातून बाहेर पडले. परंतु त्यांच्या मदतीला धावून आलेले उपनिरीक्षक एस.एस. रंधे यांना महिलांनी कक्षातच रोखून धरले.
रस्त्यावरच महिलांचा ठिय्या
वडाळी येथील देशी दारु विक्रीचे परवाना धारक प्रभू झांबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेवून बंद असलेल्या दुकानाबाबत न्यायनिर्वाळा करण्याची विंनती केली आहे. त्यानुसार न्यायालयाने जिल्हाप्रशासनाला या दुकानाबाबत योग्य निर्णय घेत अहवाल कळविण्याचे कळविले आहे. त्यानुसार बंद असलेल्या या देशी दारु विक्रीच्या दुकानासाठी पुन्हा मतदान घेण्याचे प्रतीज्ञापत्र महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी उच्च न्यायालयात सादर करुन २८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्याचे ठरविले आहे. परंतु वडाळीतील महिलांना हे देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार हवे असून आता कोणतीही मतदान प्रक्रिया नको आहे. त्यामुळेच आंदोलक महिलांनी रविवारी या बंद असलेल्या दारुच्या दुकानासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी देत देशी दारु विक्रीच्या दुकानाला कडाडून विरोध केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी कसेबसे महिलांची समजूत घालत वेळ निभवून नेली. मात्र आज सोमवार उजाळताच पुन्हा या आंदोलक महिलांनी सकाळी ११.३० वाजताचा सुमारास प्रारंभी येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिलांनी प्रचंड गोंधळ घातला. आंदोलक महिलांनी अख्ख्ये एक्साईज कार्यालय डोक्यावर घेतले. या कार्यालयातील काही रजिस्टरची फेकफाकही केली. यावेळी एक्साईजचे निरिक्षक एस.जे. ठाकूर, उपनिरिक्षक एस.एस. रंधे यांनी महिलाना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या काही केल्याविना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. रोष, अधिकाऱ्यांवर आरोप- प्रत्यारोप, अश्लिल शिविगाळ असा सतत उपक्रम सुरुच महिलांचा राहिला. कालातंराने सिटी कोतवालीचे पोलीस दाखल झाले. एक्साईजमध्ये पोलीस पोहचताच महिलांचा आक्रोश पुन्हा वाढला. मतदान होणार नाही, या ठोस आश्वासनाशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी मागणी महिलांनी रेटून धरली. एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेरुन ठेवताना जिल्हाधिकारी आल्याशिवाय एक्साईज कार्यालय सोडणार नाही, ही अट महिलांनी कायम ठेवली. परिणामी काही वेळ पोलिसांसोबतही त्यांचा वादही झाला. सिटी कोतवालीचे ठाणेदार दिलीप इंगळे यांनी आंदोलक महिलांना कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी महिला पोलिसांना तंबी दिली. यावेळी महिलांची पोलिसांसोबत तू-तू, मै-मै सुद्धा झाली. अखेर दोन तासाच्या रस्सीखेचानंतर आंदोलक महिलांना एक्साईज कार्यालयाच्या बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. यावेळी महिलांनी अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्याशाप देण्याची कोणतीही कसूर सोडली नाही. परिस्थिती चिघडण्याच्या मार्गावर असताना अखेर पोलिसांनी महिलांना कसेबसे ताब्यात घेतले.