विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं शल्य माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यात बच्चू कडू यांनाही स्वतःची जागाही राखता आली नाही. एका कार्यक्रमात त्यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा मांडला.
...तर मलाही आमदार होता आलं असतं -बच्चू कडू
"मी शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा कोणाला राग आला तरी चालेल. पण, बच्चू कडू याची पर्वा करत नाही. ही लाचारी नाहीये. मी कधीही लाचारी पत्करली नाही. तसं केलं असतं तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आलं असतं. पण, ती लाचारी आमच्यात नाही", असे बच्चू कडू म्हणाले.
भाजप-काँग्रेसवर टीका
"छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. ५० टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटलं होतं. पण, काँग्रेसने सुद्धा लागू केला नाही. पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, हे आपण ७५ वर्षात बघितले आहे", अशी टीका बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली.