-आता मायानगरात एल्गार
By Admin | Updated: February 24, 2015 01:07 IST2015-02-24T01:07:34+5:302015-02-24T01:07:34+5:30
वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होत नाही तोच नवाथे, नवसारी आता गोपालनगर

-आता मायानगरात एल्गार
अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होत नाही तोच नवाथे, नवसारी आता गोपालनगर परिसरातील मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सोमवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून दारुबंदी करण्याच्या घोषणा दिल्यात.
येथील मायानगर, गोपालनगर कृती समितीच्यावतीने मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी महिला शक्ती सरसावल्या आहेत. यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दारु विक्रीचे दुकान बंद करण्याबाबत निवेदन सादर केले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. परिणामी सोमवारी संतप्त महिला जिल्हाकचेरीवर धडकल्यात. जिल्हाधिकारी गित्ते हे बैठकीला गेल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिली. तब्बल तीन ते चार तास जिल्हाधिकाऱ्यांना येण्यास अवधी असल्याचे सांगितले गेले. निवेदन द्यायचे असेल तर अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना द्यावे, असे स्वीय सहायकांनी म्हणताच, आंदोलक महिलांचा पारा चढला. अखेर काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या. मायानगरातील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी त्यांनी आक्रमकपणे केली.
पोलिसांची उडाली तारांबळ
४सोमवार हा आंदोलनाचा 'वॉर' म्हणून गृहित धरला जातो. त्यानुसार मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिला धडकल्या. जिल्हाकचेरीच्या प्रवेशद्वारावर या महिलांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक महिला काही केल्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, असे म्हणत पोलिसांना न जुमानता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली, हे विशेष!
दारुबंदीसाठी मतदान होणार
मायानगर, गोपालनगर परिसरातील महिलांच्या मागणीनुसार देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी नियमानुसार मतदान घेतले जाईल. २५ टक्के महिलांचा त्याकरिता सहभाग आवश्यक राहील. मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभाग नोंदविल्यास हे दारु विक्रीचे दुकान बंद करणे शक्य असल्याचे एक्साईजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
विना कठड्याच्या विहिरीने घेतला बिबट्याचा बळी
दुर्लक्ष : भिवापूर-वागदा शिवारातील घटना
चांदूररेल्वे : शेतातील विना कठड्याची विहीर दीड वर्षाच्या बिबट्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची घटना चांदूररेल्वे तालुक्याच्या सीमेवरील भिवापूर वाढोणा जंगलालगत शेतशिवारात घडली. शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट्या सरळ विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटना शनिवारच्या सायंकाळी उघडकीस आली.
चांदूररेल्वे तालुक्याच्या सिमेवरील भिवापूर वाढोणा जंगलाला लागून असलेल्या भिवापूर-वागदा शेत शिवारात दीपक कनोजे यांच्या शेतातील विहिरीत मृत बिबट्या आढळल्याची घटना शनिवारच्या सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चांदूररेल्वे उपवनपरिक्षेत्राचे आरएफओ अनंत गावंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. रात्र झाल्यामुळे मृत बिबट्याला रविवारी सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले. उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात व सहायक उपवनसंरक्षक व्ही. एम. मिसाळकर यांच्या उपस्थितीत आरएफओ अनंत गावंडे यांनी पशूधन विकास अधिकारी यांच्या हस्ते बिबट्याचे शवविच्छेदन केले.