अंजनगाव शहरात माजी नगराध्यक्षांच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:36+5:302021-04-08T04:14:36+5:30
वनोजा बाग : शहरातील सुर्जी भागात बुधवारी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा हनीफाबी मो. शरीफ अन्सारी यांच्या घरी ...

अंजनगाव शहरात माजी नगराध्यक्षांच्या घरात चोरी
वनोजा बाग : शहरातील सुर्जी भागात बुधवारी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा हनीफाबी मो. शरीफ अन्सारी यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे.
माजी नगराध्यक्ष यांच्या मुलाला कोरोना झाल्याने तो उपचारासाठी अकोला येथे रुग्णालयात असल्याने त्या घरात आठ दिवसांपासून कुणी नसल्याने घराला कुलूप होते. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला व लाखोंचा ऐवज पळविला. शेजाऱ्याला घराचा वरचा दरवाजा उघडा आढळल्याने त्याने फोनव्दारे माहिती दिल्याने त्यांच्या मुलांनी मंगळवारी घरी येऊन पाहिले असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त झालेले दिसले. ३१ मार्चपासून ५ एप्रिल दरम्यान घर बंद असल्यामुळे नेमकी चोरी कधी झाली, हे लक्षात आले नसून चोरट्यांनी ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८२० ग्राम चांदीचे दागिने व रोख रक्कम एक लाख ९० हजार असा एकूण तीन लक्ष ६२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार जकिया बानो मो.राजिक यांनी अंजनगाव पोलिसांत केली असून, अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.
बॉक्स
याआधी अंजनगाव शहरात कोरोनामुळे रुग्णालयात दाखल नागरिकाच्या घरात चोरट्यानी हात साफ केल्याची घटना घडली. शहरातील ही दुसरी घटना आहे. अशा घरांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवावी, असे नागरिकाची मागणी होत आहे.