‘सेस’ची चोरी, १० पट दंड

By Admin | Updated: October 22, 2015 00:07 IST2015-10-22T00:07:31+5:302015-10-22T00:07:31+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांव्दारे ‘सेस’ला चूना लावण्याचा नवा फंडा मंगळवारी रात्री उघडकीस आला.

Theft of 'cess', 10-foot penalty | ‘सेस’ची चोरी, १० पट दंड

‘सेस’ची चोरी, १० पट दंड

अमरावती बाजार समिती : सोयाबीन ऐवजी गव्हाच्या ट्रकची गेटपास
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांव्दारे ‘सेस’ला चूना लावण्याचा नवा फंडा मंगळवारी रात्री उघडकीस आला. सोयाबीनचा ट्रक असताना गव्हाच्या ट्रकची गेटपास काढून सोयाबीनचे पोते गेटबाहेर काढण्याचा प्रकार एका व्यापाऱ्याने केला. संबंधित प्रतिष्ठानावर ‘सेस’ चोरीचा ठपका ठेऊन त्यांच्याकडून १० पट अधिक ‘सेस’ वसूल करण्यात येणार आहे.
बाजार समितीचे व्यापारी परवानाधारक असणाऱ्या बालाजी एंटरप्राईजेसव्दारा बुधवारी रात्री ट्रक जी.जे.१-ए.टी. ३९३० मध्ये गव्हाची २१० पोती असल्याची गेटपास घेण्यात आली. ट्रक बाहेर जाण्याकरिता गेटवर आला असता. तेथील सुरक्षा रक्षकाने ट्रकची पाहणी केली. तेव्हा ट्रकमध्ये गव्हाऐवजी सोयाबीनचा माल असल्याचे आढळून आले. सुरक्षा रक्षकाने याची माहिती बाजार समितीचे सचिव भुजंग डोईफोडे यांना दिली व ट्रक बाजार समितीच्या आवारातच उभा केला. गुरुवारी सकाळी सभापती, संचालकांनी पाहणी करून प्रतिष्ठानची खरेदीची कागदपत्रे चौकशीसाठी जप्त करण्यात आली. व्यवस्थापन समितीच्या चर्चेअंती या प्रतिष्ठानवर बाजार समिती अधिनियमनाच्या आधारे १० पट अधिक सेस वसूल करण्याचे निर्देश सभापती सुनील वऱ्हाडे यांनी दिले.

१५ दिवसांत ४ हजार क्विंटल गहू बाहेर
प्राप्त माहितीनुसार बालाजी एंटरप्राईजेसव्दारा ३ ते २० आॅक्टोबर या कालावधीत सोयाबीनचा ८१५ व गव्हाचा ३,९३७ पोते माल गेटपासव्दारे बाहेर काढण्यात आला. बाजार समितीत सध्या सोयाबीनची सर्वाधिक आवक आहे. त्या तुलनेत गव्हाची आवकच नाही. त्यामुळे बाजार समितीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे.

वजनकाट्यात हेरफेर उघड
वजनकाट्याच्या खाली काँक्रीटचे मोठे तुकडे फसविण्यात आल्याचे सभापती वऱ्हाडे यांनी केलेल्या पाहणीत आढळले. तसेच येथील संगणकही बंद आहेत. त्यामुळे हाताने वजनमापे लिहिणे सुरू होते. वजनकाट्याभोवती काटेरी झुडपी वाढली आहे. हा हेराफेरीचा प्रकार असल्याने सुनील वऱ्हाडे यांनी ‘आॅनस्पॉट’ दोन कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले.

लिपिकाची बदली, दोन कर्मचाऱ्यांची सेवा बाद
बाजार समितीच्या भाजीबाजारात ‘सेस’च्या पावत्या न देताच वाहने बाहेर काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे सभापती सुनील वऱ्हाडे यांना पाहणीदरम्यान निर्दशनास आल्याने लिपीक गजेंद्र देशमुख यांची तत्काळ बदली करण्यात आली व वजनकाट्यात बेजबाबदारपणा आढळल्याने भूषण देशमुख व भूपेंद्र विधळे या रोजंदारी कर्मचाऱ्यास कामावरुन कमी केल्याचे वऱ्हाडे यांनी सांगितले.

बुधवारी भाजी मार्केटमध्ये सेसची चोरी पकडून कारवाई केली. गेटपास प्रकरणात ‘सेस’च्या १० पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. वजनकाट्यात गैरप्रकार आढळल्याने दोन कर्मचाऱ्यांवर ‘आॅनस्पॉट’ कारवाई करण्यात आली.
- सुनील वऱ्हाडे, सभापती, बाजार समिती.

Web Title: Theft of 'cess', 10-foot penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.