तळेगाव येथे २ लाख ५९ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:26+5:302021-03-19T04:12:26+5:30
सोन्याचा ऐवज लांबविला : भिशीची रक्कमही चोरीला तळेगाव दशासर : स्थानिक प्रभाग क्र. ४ मधील रहिवासी योगेश ...

तळेगाव येथे २ लाख ५९ हजारांची चोरी
सोन्याचा ऐवज लांबविला : भिशीची रक्कमही चोरीला
तळेगाव दशासर : स्थानिक प्रभाग क्र. ४ मधील रहिवासी योगेश संजय शर्मा यांच्या घरातून अज्ञात चोरांनी २ लाख ५९ हजारांचा सोन्याचा ऐवज व रोख लंपास करण्यात आला. १६ मार्च रोजी ही घटना उघड झाली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, योगेश शर्मा हे १५ मार्च रोजी त्यांचे मामाच्या मुलीचे साक्षगंध असल्याने घरातील सर्व सदस्यांसमवेत चंद्रपूर येथे गेले होते. चंद्रपूरहून १६ मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास ते घरी पोहोचले असता, घरापुढील दाराचे कुलूप उघडून आत गेले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घराची पाहणी केली असता, स्वयंपाक खोलीशेजारील देवघरातील कपाट उघडे दिसले. कपाटामधील साड्या, कपडे, मुलीची पर्स अस्तावस्त पडले दिसले. बारकाईने पाहणी केली असता, कपाटातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ६ हजार रुपये किमतीचे कानातले, ३६ हजार रुपये किमतीची तीन अंगठ्या, २५ हजारांची सोन्याची चेन, दोन जेन्ट्स अंगठ्या, ७८ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचा माल चोरीला गेला. १५ ते १६ मार्च दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार अजय आखरे हे बिरांजे, आगाशे, जमादार महादेव पोकळे, संजय भोपळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. जागेचा पंचनामा करण्यात आला. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
पान २ ची बॉटम