लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत कोट्यवधींची मग्रारोहयो अंतर्गत कामे आता वादग्रस्त ठरली आहेत. धरमडोह ग्रामपंचायतीच्या बहाद्दरपूर येथील प्रकारानंतर चिखली ग्रामपंचायतीच्या भिरोजा गावात एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील विहीर खोदकाम दाखवून लाखो रुपये लाटले गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यासंदर्भात बीडीओंना तक्रार देण्यात आली. लोकमतने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. एका आठवड्यात दुसरे प्रकरण पुढे आल्याने ते आता खरे ठरू लागले आहे.
तुळशीराम भैयालाल बेलकर (रा. भिरोजा) असे विहीर चोरीला गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तक्रारीनुसार, चिखली ग्रामपंचायतअंतर्गत ते राहत असले तरी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ते पुण्याला कामाला आहेत. त्यादरम्यान त्यांच्या शेतात विहीर मंजूर करून त्यावर रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर दाखविले गेले. या कामावर लाखो रुपये काढण्यात आल्याची तक्रार खंडविकास अधिकाऱ्यांना त्यांनी केली.
प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारचे काम त्यांच्या शेतात झालेले नाही. त्यामुळे विहीर चोरीलाच गेली असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. संबंधितांवर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिखलीचे मजूर चार किलोमीटर गेले कामालाइकडे तुळशीराम बेलकर या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचा पत्ता नाही, तर दुसरीकडे चिखली येथील २९ मजूर चार किलोमीटर अंतरावर विहिरीच्या कामाला गेल्याचा अहवाल कागदोपत्री तयार करून पैसे लाटले गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.
२९ मजुरांनी केले कामशेतात मजूर दाखवून तब्बल २९ लोकांनी तीन हजेरी पत्रकांवर हजेरी लावून मजुरी काढली व शासनाकडून मिळणारा लाभ हडपला. हे सर्व संगनमताने रोजगार सेवक, तांत्रिक, ग्रामसेवक व चेतन लक्ष्मीनारायण झाडकर यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
"आपण पुण्याला काही शैक्षणिक कामानिमित्त गेलो असता, शेतात विहिरीकरिता २९ मजूर राबल्याचे व त्यावर तीन मस्टरद्वारे पैसे काढल्याची माहिती आहे. तथापि, माझ्या शेतात विहिरीचा पत्ताच नाही."- तुळशीराम बेलकर शेतकरी, भिरोजा, ता. चिखलदरा