मेळघाटात पाणी पेटले, विहिरींना बूड लागले; जलस्रोत आटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:17 AM2024-04-24T11:17:04+5:302024-04-24T11:20:09+5:30

Amravati : टँकर सुरु, जलजीवनच्या योजना काही गावांमध्ये फेल

The water crisis in Melghat is at worst, the wells are empty; Water sources dried up | मेळघाटात पाणी पेटले, विहिरींना बूड लागले; जलस्रोत आटले

Melghat wells dried

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना मात्र मेळघाटात पाणी पेटल्याचे भीषण वास्तव आहे. जलजीवन मिशन योजना गावागावांत राबविली असली तरी अभियंत्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना फेल झाली आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे यंदाही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

शासनाकडून पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने मेळघाटातील गावांमध्ये जलकुंभ बांधले. नळ घरापर्यंत पोहोचविले. मात्र नळाद्वारे पाणी घरापर्यंत गेले नाही. त्यामुळे मेळघाटात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल रस्त्यालगतच्या गावांमध्ये पाण्याची ओरड आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या. मात्र, स्त्रोत आटले असून, काही ठिकाणी मोटार जळाल्याची समस्या पुढे आली आहे. विहिरींना बूड लागले. वीज देयके अदा करण्यात आली नाहीत. अशा एक ना अनेक समस्या पाणीपुरवठ्याशी निगडित निर्माण झाल्या आहेत. गावातील विहिरींना बूड लागल्याने दोन ते तीन किमी अंतरावरून आदिवासी गावे, पाड्यातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना मेळघाटातील जलसंकटावर दुर्लक्ष केले जात आहे.


या गावांमध्ये जलसंकट
मेळघाटातील ढाकणा, बुटीदा, चुनखडी, खडीमल, माखला, आकी, चवऱ्यामल, हतरू, रायपूर या आदिवासी गावांमध्ये जलसंकट असल्याची माहिती आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून तलाव साकारण्यात असले तरी अनेक तलाव आटले आहेत. तसेच २० लाखांच्या निधीतून एक विहीर निर्माण झाली असली तर बहुतांश विहिरींना बूड लागले आहे. हल्ली उन्हाळा असल्यामुळे वसतिगृह, आश्रमशाळांतील मुले घरी परतली आहेत. पाण्याचा वापर वाढला असताना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

 

टँकरने पाणीपुरवठा : प्रशासनाकडून काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही गावांत आवश्यकता असताना त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड आहे. पाणी समस्या निर्माण झालेल्या गावांमध्ये बीडीओनी पाहणी केली. मात्र, जलजीवन मिशन योजना राबविणाऱ्या यंत्रणेचे अभियंता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात भेटी देण्याचे टाळले हे विशेष. बेला, मोथा या दोन गावात तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
 

Web Title: The water crisis in Melghat is at worst, the wells are empty; Water sources dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.