संदीप राऊत लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.
नांदगावपेठ पंचतारांकित एमआयडीसीत (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्पासाठी वाघोलीवासीयांची सर्वाधिक जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे येथील नव्वद टक्के शेतकरी भूमिहीन झाले. आदिवासी तथा फासेपारधी समाजाची ही वसाहत आहे. आता बोटावर मोजण्याएवढे शेतकरी शिल्लक आहे. त्यांच्याही शेतजमिनीला प्रकल्पातील प्रदूषणाने ग्रासले असून शेतातील कणाकणांवर व पिकांच्या पानापानांवर राखेचा थर साचल्याने शेतीतून दमडीचेही उत्पन्न होत नाही. पुनर्वसनाचा मुद्दा रेटून धरत येथील ग्रामपंचायत व रहिवाशांनी गेल्या दहा वर्षात अनेकदा प्रशासन तथा लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला.
मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. यादरम्यान नागरिकांना आणखी काही वर्षे येथे वास्तव्य करावे लागले, तर प्रदूषणामुळे नागरिक दुर्धर आजाराचे बळी ठरतील व गाव ओस पडेल, ही भीती सरपंच मनीषा राजेश बारबुद्धे यांनी व्यक्त केली.
गावातील तलावात रसायनयुक्त पाणी
औष्णिक प्रकल्पातील केमिकलयुक्त पाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे तलावातील पाणी पशू-पक्ष्यांनाही पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीलगत जिल्हा परिषद शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात अप्रत्यक्ष अन्नासह राखेचे कणही जातात.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण दिसत नाही का, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्लाय अॅशवर उपाययोजना करण्यासाठी कंपनीला यापूर्वी अवगत केले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंडळाचे अधिकारी जितेंद्र पुराते म्हणाले.
Web Summary : Wagholi villagers suffer as the Ratan India plant pollutes air and water. Farmlands are ruined, health deteriorates, and relocation demands intensify. Authorities are urged to act.
Web Summary : रतन इंडिया प्लांट से वाघोली में प्रदूषण फैल रहा है। खेत बर्बाद हो रहे हैं, स्वास्थ्य बिगड़ रहा है, और पुनर्वास की मांग बढ़ रही है। अधिकारियों से कार्रवाई का आग्रह किया गया है।