संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट
By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 20:54 IST2024-01-27T20:54:25+5:302024-01-27T20:54:33+5:30
५२ दिवसानंतर तिढा सुटला:पोषण आहाराचे वाटप सुरळीत.

संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट
अमरावती: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उभारलेला संप मिटला असून जिल्ह्यातील सर्व ५२ दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस कामावर शनिवारपासून कामावर परतल्या आहेत. त्यामुळे अडीच हजारावर अंगणवाडी केंद्र उघडले असून अंगणवाडी केंद्राची मुले आलेले असून त्यांना आहार वाटप करण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पुन्हा किलबिलिट सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ४ डिसेंबरपासून शासकीय सेवेत कायम करण्यासाठी मानधनवाढीच्या मागण्यासाठी संप पुकारला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील २६४६ अंगणवाडीतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्या बंद होत्या. अखेर ५२ दिवसांनंतर गुरुवार २५ जानेवारी रोजी मुंबई येथे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युईटीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय तसेच नवीन मोबाईल देण्याची मागण्या मान्य करण्यात आला. तर मानधनवाढीसंदर्भात पुढे चर्चा करण्यात येणार आहे.दरम्यान यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे समाधान झाल्याने तूर्तास कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका,मदतनिसाच्या संपाकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने शनिवारपासून जिल्ह्यातील २ हजार ६४६ अंगणवाड्याचे टाळे उघडले आहेत.परिणामी जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी केंद्रात चिमुकल्याचा ५२ दिवसानंतर किलबिलाट सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
आता चिमुकल्यांना नियमित पोषण आहार
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तब्बल ५२ दिवस चालले. त्यामुळे एवढे दिवस अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागले होते. मात्र आंदोलन मागे झाल्याने शनिवारपासून चिमुकल्यांना नियमित पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासन सुरुवातीपासूनच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सकारात्मक होते. संप बरेच दिवस सुरू होता. परंतु आता अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यामुळे अंगणवाडी केंद्र पूर्ववत सुरू झाल्या आहेत
-डॉ.कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती