सागवानाची झाडे हॅमर करून देत होता पास; परतवाड्याच्या वनपालावर डिमांड ट्रॅप
By प्रदीप भाकरे | Updated: November 8, 2025 13:51 IST2025-11-08T13:46:47+5:302025-11-08T13:51:34+5:30
एसीबीची कारवाई : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

The passerby was hammering teak trees; Demand trap on the forester of Parthwada
अमरावती : सागवानाची झाडे हॅमर करून रहदारी पास देण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी परतवाडा येथील एका वनपालाला एसीबीने ट्रॅप केले. अभय भिमसेन चंदेल (५०, रा. कांडली, परतवाडा) असे लाचखोर वनपालाचे नाव आहे. चंदेल हा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय, परतवाडा येथे वनपाल म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध एसीबीच्या पोलिस निरीक्षक निलिमा सातव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.५२ च्या सुमारास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९६८ च्या कलम ७, ७ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारदाराची अचलपूर तालुक्यातील मौजे म्हसोना येथे आठ एक्कर शेती आहे. त्यांनी शेतात २० वर्षांआधी अंदाजे सागवानाची १२५ झाडे लावली होती. त्यापैकी ५० झाडे कापण्यासाठी त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक परतवाडा येथे त्यांच्या मुलाच्या नावाने अर्ज केला होता. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी यांनी जाहिरनामा करून कायदेशिर कार्यवाही पूर्ण केली होती. याच प्रकरणात प्रादेशिक कार्यालय परतवाडा येथील वनपाल अभय भिमसेन चंदेल याने तकारदार यांना हॅमर करून रहदारी पास देण्यासाठी ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ३१ जुलै रोजीच्या तक्रारीवर एसीबीच्या अमरावतीच्या पथकाने १ ऑगस्ट रोजी त्या डिमांडची पडताळणी केली. अभय भिमसेन चंदेल याने तडजोडीअंती सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्नदेखील झाले. मात्र पडताळणी कारवाईदरम्यान चंदेल याला तक्रारदारावर संशय आल्याने त्याने लाच रक्कम घेण्याबाबत टाळाटाळ करून ती लाच रक्कम स्विकारली नाही.
यांनी केली कारवाई
अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षक सुनिल किनगे, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक निलीमा सातव, पोलीस अंमलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले, आशिष जांभोळे व अंमलदार गोवर्धन नाईक यांनी ही कारवाई पार पाडली.