लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वीरगव्हाण येथील ११ वर्षीय मुलगा बराच शोधाशोध करूनही दिसून न आल्याने तीन दिवसांपूर्वी वडील विजय राठोड यांनी कुन्हा पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली. अखेर गावानजीक शेततळ्यात मंगळवारी मृतदेह आढळला. याप्रकरणी वेगळीच माहिती पुढे आली.
धूप विजय राठोड (११) असे मृत मुलाचे नाव असून तो वीरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता एका गुराख्याला शेततळ्यात मृतदेह दिसून आला. कुन्हा पोलिसांच्या माहितीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह बाहेर काढला.
पोलिस सूत्रांनुसार, १३ सप्टेंबर रोजी धूप हा शाळकरी मित्रांबरोबर शेततळ्यात पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. यामुळे सोबत असलेले मित्र घाबरले व त्यांनी पळ काढला. अखेर मुलांना विश्वासघात घेऊन विचारणा केली असता, त्यांनी घडलेली घटना विशद केली. त्यामुळे धृपच्या मृत्यूबद्दल लावण्यात येत असलेल्या तर्कवितर्काना पूर्णविराम मिळाला. यावेळी न्यायवैद्यक चमू व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.