१३ वर्षीय लेकीवर नराधम बापानेच टाकला हात
By प्रदीप भाकरे | Updated: May 15, 2024 18:43 IST2024-05-15T18:42:55+5:302024-05-15T18:43:18+5:30
आई स्वयंपाकाला गेली, चाकूने भोसकण्याची धमकी : मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील घटना

The 13-year-old girl was sextually harassed by father
अमरावती : चक्क जन्मदात्या वडिलाने आपल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मोर्शी तालुक्यात उघड झाली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी १४ मे रोजी सायंकाळी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी पीडित १३ वर्षीय मुलीची आई स्वयंपाकासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी घरी आलेल्या वडिलाने तिच्याकडे अश्लाघ्य, अश्लील मागणी केली. मात्र, तिने मी तुमची मुलगी असल्याचे सांगून त्यास नकार दिला. त्यावर वडिलाने तिला चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील आपल्या चिमुकल्या मुलीवर त्या नराधम पित्याने अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुलगी रडायला लागली. त्यावर वडिलाने तिला मारण्याची धमकी दिली. यापूर्वीसुद्धा मार्चमध्ये वडिलाने अत्याचार केल्याने पीडित मुलीने धाडस करीत आप्ताकडे आपबीती कथन केली. हा धक्कादायक प्रकार कळल्यावर पीडिताच्या नातेवाइक महिलेने मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाविरुद्ध बलात्कार, धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.