हीच काय संस्कृती?

By Admin | Updated: October 1, 2015 00:27 IST2015-10-01T00:27:23+5:302015-10-01T00:27:23+5:30

समाजाचा आधार असलेले ज्येष्ठ नागरिक परावलंबी झाल्याचे चित्र आज आहे.

That's what culture? | हीच काय संस्कृती?

हीच काय संस्कृती?

ज्येष्ठ श्रेष्ठच !
व्यक्तीने वयाचे ६० वर्षे पूर्ण केले की, त्यांची गणना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून केली जाते. या ज्येष्ठ नागरिकांनी अनेक-उन्हाळे-पावसाळे पाहिले असल्याने नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शकाची भूमिका वठवतात. अशा अनुभवसंपन्न ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ १ आॅक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वृद्धांच्या एकूणच समस्यांचा घेतलेला हा धांडोळा !


आईवडील : अडगळ नव्हे समृद्धी
अमरावती : समाजाचा आधार असलेले ज्येष्ठ नागरिक परावलंबी झाल्याचे चित्र आज आहे. भौतिकतेच्या आहारी जाऊन अतिप्रतिष्ठा जपण्यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात पाठविणारी एक पिढीच निर्माण झाली आहे. ज्या काळात शाळा - महाविद्यालयांची संख्या वाढायला हवी, त्या संगणक युगात आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. अमरावतीसारख्या शहरातच आज तीनपेक्षा अधिक वृद्धाश्रमांतून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे. घरातील वृद्ध सदस्याला वृद्धाश्रमात पाठविणे हीच का आमुची संस्कृती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो.
मुलगा, सून, नातू असे सर्वच नोकरी करणारे, कधी कुणाशी पटत नाही, तरी कधी वृद्धाला त्याला हवी असलेली ‘स्पेस’ मिळत नाही. कधी सुनेचा टोमणा वर्णी लागतो. कधी टोकाचे वाद होतात. वृद्धाश्रमासाठीचे मार्गक्रमण त्यातूनच सुरू होते.
अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८८ हजारांच्या घरात असून २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यात ६० वर्षांवरील तीन लाख २१ हजार वृद्ध व्यक्ती आहेत. यातील बहुतांश जणांचे जीणे सुखावह असला तरी हजारो जणांना आज निराधार निराश्रित म्हणून जीवन जगावे लागते. तडजोड म्हणून हे वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमात समाधानी दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या मनात एकंदरीतच कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेविषयी चीड निर्माण झाली आहे.
गुरुवार १ आॅक्टोबरला होणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वूमीवर ‘दीन’वाने जीवन जगणाऱ्या वृद्धांचा हालहवाल जाणून घेतला असता भयावह परिस्थिती समोर आली. कमावती मुलं, मुली असताना घरदार असताना अनेक जण पेन्शनर असताना वृद्धाश्रमात लाचारीचे जीणे जगत आहेत. त्याची कारणमीमांसा होऊन आजच्या प्रगत पिढीने अंतर्मुखाने मंथन करणे गरजेचे आहे. वृद्धावस्था म्हणजे खरे तर वार्धक्यावस्थेतील सुवर्णकाळ. नातवांसोबत मस्त आयष्य जगण्याचे दिवस. कुठलेही बंधने नसलेले मुक्त जीवन जगण्याचा काळ. मात्र याच वृद्धावस्थेत अनेकांना वृद्धाश्रमाला सोबती करावे लागले. नजीकच्या वलगाव येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित संत गाडगेबाबा मिशनद्वारे वृद्धाश्रम चालवला जातो. या वृद्धाश्रमात वय वर्षे ७० ते ९० वयोगटातील ३० लोक एकत्र राहतात. आणि दु:ख हे त्यांच्यातील समान धागा. या धाग्यानेच कौटुंबिक सदस्यांपासून दूर वार्धक्य अवस्थेतील शेवटचा काळ या ठिकाणी ते काढत आहेत.
वलगाव येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता उघड झाले. कमालीचे नैराश्य आणि परिस्थितीने दिलेले चटके सहन करीत हे वृद्ध आज म्हणायला समाधानी असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या अन् सुरकुत्यांमधून डोकावणाऱ्या वेदना अलगद बोलून जातात.
कृष्णराव आणि लिलाताई भांगे या दाम्पत्यासारखे दु:ख अनेकांच्या वाट्याला आलेले. मात्र हे वृद्ध त्याबद्दल बोलणे टाळतात. आता हेच आपले संचित, असे सांगणारे जळगाव जिल्ह्यातील बोदवड गावातील किसन पंडित असोत की बहिरम गोविंदपूरचे भीमराव असोत. सर्वांच्या कथा वेगवेगळ्या, मात्र व्यथा एकच!

Web Title: That's what culture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.