ठाण मांडून बसलेल्यांचीही होणार उचलबांगडी
By Admin | Updated: May 9, 2014 00:58 IST2014-05-09T00:58:01+5:302014-05-09T00:58:01+5:30
राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे.

ठाण मांडून बसलेल्यांचीही होणार उचलबांगडी
अमरावती : राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे. अशा कर्मचार्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्यांनाही बदल्यांच्या प्रक्रियेत रडारवर घेतले जाणार असल्याने अशा महाशयाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्यांच्या विनंती, प्रशासकीय बदल्या करण्याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. यानुसार तालुका स्तरापासून येत्या १७ मे रोजी बदल्याची कारवाई सुरु होणार आहे. यासाठी पं.स. आणि जि. प.च्या मुख्यालयातील सर्वच विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासाठी बदलीपात्र कर्मचार्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहेत.
ही प्रक्रिया करत असताना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत मागील आठ वर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून काम करणार्या कर्मचार्यांची संख्याही फार मोठी आहे. जिल्हा परिषदेतील काही राजकीय नेत्यांच्या साहाय्याने प्रतिनियुक्तीवर विविध कामे सांभाळत असलेले कर्मचारीही कमी नाहीत. दरवर्षी बदल्यांच्या प्रक्रियेत अशा कर्मचार्यांपैकी आपली खुर्ची सोईची राहावी, यासाठी माहीर असलेल्यांनी आतापासूनच बचावासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र यावर्षी ठाणबंदी झालेले व प्रतिनियुक्तीवर असलेले सर्वच कर्मचारी बदल्यांमध्ये इतरत्र पाठविले जाणार आहेत. अशांची यादी सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांकडून मागविली जात आहे. यामुळे मात्र ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)