दहावीच्या विद्यार्थ्यांची ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी
By Admin | Updated: February 2, 2016 00:08 IST2016-02-02T00:08:43+5:302016-02-02T00:08:43+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी
मानसशास्त्रीय चाचण्या : व्यवसाय शिक्षण निवडण्यासाठी निर्णायक
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे. या चाचण्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. तेथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राच्या निवडीला प्रारंभ करतात. मात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्यास ते चुकीच्या विषयाकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण व नैराश्याचे प्रमाण वाढायला लागते. या प्रकाराला आळा घालून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, या दृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
या अनुषंगाने २ महिन्यांपासून कलचाचणी घेण्याची तयारी शिक्षण विभागाद्वारा सुरू आहे. यासाठी ९ ते २३ डिसेंबर २०१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेमधील सर्व संगणकांचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकाची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कल चाचण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या चाचण्या आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे व ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.(प्रतिनिधी)
१५२ प्रश्न, ४० मिनिटांचा राहणार वेळ
विद्यार्थ्यांच्या कल ओळखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहे. विद्यार्थ्यांना ४० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच दहावीच्या निकालापासून विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यवसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
निर्धारित वेळेत या कल चाचण्या होणार आहेत व चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांना कुठलाही ताण येऊ नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
- सी. आर. राठोड,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)