अतिक्रमणातील बुद्ध मूर्ती हटविल्याने जवाहरनगरात तणाव
By Admin | Updated: January 13, 2015 22:51 IST2015-01-13T22:51:57+5:302015-01-13T22:51:57+5:30
महापालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी पहाटे ४ वाजतापासून विलासनगर भागातील काही अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरु करण्यात आले होते.

अतिक्रमणातील बुद्ध मूर्ती हटविल्याने जवाहरनगरात तणाव
अमरावती : महापालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी पहाटे ४ वाजतापासून विलासनगर भागातील काही अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरु करण्यात आले होते. दरम्यान जवाहरनगरात आरक्षित जागेवर असलेली बुद्ध मूर्ती हटविण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष उफाळून आला होता. या रोषामुळे जवाहरनगरात पहाटेच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने तणाव निवळला.
जवाहरनगरातील एका शासकीय जागेवर महापालिकेने उद्यान निर्मितीकरिता जागा आरक्षित केली होती. मात्र २०१३ मध्ये एका समुदयाने बुद्ध मूर्तीची स्थापना या आरक्षित जागेवर केली होती. त्यावेळी या मूर्तीच्या स्थापनेबाबत पकंज काळे यांच्यासह ६ जणांनी आक्षेप नोंदविला होता. ही मूर्ती हटविण्यासाठी काही नागरिकांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
पहाटे ४ वाजता कारवाई
याप्रकरणी जानेवारी २०१४ मध्ये सुनावणी सुरु झाल्यावर सप्टेंबर महिन्यात मूर्ती हटविण्याचा निकाल दिला. मात्र महापालिकेकडून कारवाई केली नव्हती. त्यामुळे न्यायालयाकडून महापालिकेला त्या अनधिकृत अतिक्रमाबद्दल नोटीस पाठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नगररचना विभागाचे जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे, अतिक्रमण विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, निरीक्षक उमेश सवई यांच्या नेत्तृत्वात पथकांने जवाहर नगरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. दरम्यान मूर्ती हटविताना गाडगेनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी असे ७० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पहाटे ४.४५ वाजता दरम्यान अतिक्रमण हटविताना आरक्षित जागेवरील ती मूर्ती सुध्दा हटविण्यात आली. यावेळी येथील काही रहिवाश्यांनी अतिक्रमण काढताना रोष व्यक्त केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.