दहा वर्षांपूर्वीही आश्रमात मुलाचा संशयास्पद मृत्यू !

By Admin | Updated: September 15, 2016 00:08 IST2016-09-15T00:08:58+5:302016-09-15T00:08:58+5:30

शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पिंपळखुटा येथील आश्रमात दहा वर्षांपूर्वीही एका मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची माहिती शोधमोहिमेत पुढे आली आहे.

Ten years back, the child's suspicious death in the ashram! | दहा वर्षांपूर्वीही आश्रमात मुलाचा संशयास्पद मृत्यू !

दहा वर्षांपूर्वीही आश्रमात मुलाचा संशयास्पद मृत्यू !

घाडगेंचे अभय ? : प्रथमेशला धोका असल्याची तक्रार, चौधरी तरीही मोकळेच
अमरावती : शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पिंपळखुटा येथील आश्रमात दहा वर्षांपूर्वीही एका मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची माहिती शोधमोहिमेत पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास आणखी धक्कादायक बाबींचा उलगडा होऊ शकेल.
प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात ७ आॅगस्ट रोजी घडला. या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांनी पकडले. त्यांनी नरबळीच्या प्रयत्नांचे दोन गुन्हे कबुल केलेत. तपासात निष्पन्न झालेल्या या मुद्यांवर अमरावती ग्रामीण पोलीस समाधानी आहेत. ज्या जिल्ह्याने देशाला संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे महापुरुष दिलेत, त्या जिल्ह्यातील एका आश्रमात दोन विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा प्रयत्न होतो, ही घटनाच कायद्याच्या रक्षकांना मुळापासून हादरवणारी ठरावी. जे दृष्टीस पडते त्याहीपलिकडचे शोधून काढण्यासाठी पोलिसांनीही तपासाचे आव्हान स्वीकारावे, असेच हे गंभीर प्रकरण.
आश्रम हा विश्वशांतीच्या कार्यासाठी निर्मिलेला आहे, अशी भावना आणि विश्वास आश्रमाशी जुळलेल्या लोकांचा आहे. पोलिसांनी त्या मंडळींची ती बाजू निश्चितच विचारात घ्यावी. त्याचवेळी आश्रमात अनेक आक्षेपार्ह कृत्ये घडल्याची निरीक्षणे अनेक सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी आणि सामान्य माणसांनी नोंदविलीत. तशी अधिकृत निवेदनेही शासनाला दिलीत. त्यासाठी आक्रमक आंदोलने छेडलीत, त्यांचाही विचार व्हावा.
तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांना दोन घटना आणि तीन आरोपींवर समाधान असेल. याशिवाय कुठलीही गैरकायदा बाब आश्रमात घडली नाहीच, असा विश्वास असेल तर हजारो लोकांनी व्यक्त केलेली चिंता आणि निरीक्षणे महत्त्वहीन ठरतात. जिल्हाभरातील हजारो लोक बेदखल ठरतात. शंकर महाराज यांच्या आश्रमात नरबळीचे प्रयत्न घडल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हाभरात कधी नव्हे ते व्यापक वैचारिक अभिसरण घडून आले. पोटच्या लेकासाठी व्हावे, तसे लोक प्रथमेश आणि अजयसाठी अस्वस्थ झालेत- हे सर्व विनारकारणच घडले असेल काय? लोकांच्या निरीक्षणांना जराही आधार नसेल काय? लोकभावना चुकीची आणि ट्रस्टी योग्य हेच तपासाचे फलित मानायचे काय? कायद्याच्याच आडोशाने बड्यांचे गंभीर गुन्हे दबतात, हा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती येथे घडेल की काय, अशी साशंकता आता सार्वजनिक चर्चेचा मुद्दा झाली आहे. कारणही तसेच आहे- प्रथमेशच्या नातेवाईकांनी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या नावानिशी धमकावण्याची, प्रथमेशला धोका उत्पन्न करण्याची तक्रार नोंदवूनही श्रीनिवास घाडगे यांना शिरीष चौधरी अटक करावीशी वाटत नाही.

Web Title: Ten years back, the child's suspicious death in the ashram!