ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अमरावतीच्या झेडपी भरतीत दहा टक्के आरक्षण
By जितेंद्र दखने | Updated: December 6, 2022 18:30 IST2022-12-06T18:27:23+5:302022-12-06T18:30:09+5:30
सरळ सेवेच्या पद भरतीची मिळणार संधी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अमरावतीच्या झेडपी भरतीत दहा टक्के आरक्षण
अमरावती: राज्यात जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट प्रवर्गाची पदभरतीसाठी येत्या जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित पदभरती करताना ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के आरक्षण देऊन पद भरती करावी असे निर्देश राज्याचे अववर सचिव विजय चांदेकर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.याबाबत १ डिसेंबर रोजी मिनीमंत्रालयात लेखी आदेश धडकले आहेत.या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय दहा वर्षे सलग पूर्ण वेळ सेवा केली असेल असा पंचायत कर्मचारी जिल्हा सेवेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कोणत्याही पदावरील नियुक्तीसाठी पात्र असेल. त्याची नियुक्ती थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जेष्ठतेच्या आधारे संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावयाची पदेही नामनिर्देशनाने सरळसेवेने पदभरती करताना जिल्हा परिषदेची संबंधी संवर्गात रिक्त घोषित केलेल्या एकूण पदाच्या ९० टक्के पदे जाहिरातीव्दारे व १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पद भरती करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेतील गट क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च महिन्यात २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.परंतु संबंधित भारतीय रद्द करण्यात आली आहे.
आता जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .तसेच वित्त विभागाने ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंधत अद्याप अंतिम झालेला नाही .अशा विभागातील ८० टक्के मर्यादेपर्यत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने १४ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेतील गट क मधील सर्व संवर्गाची वाहनचालक व गट ड वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्याबाबत सुधारित कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत कार्यवाही डिसेंबर २०२२ अखेर पर्यतच्या रिक्त होणारे पदे विचारात घेवून त्याअनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून १० टक्के कोट्यातून ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ,कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आदी पदे भरण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत कर्मचारी व अनुकंपा भरती व भरती प्रक्रिया होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पदरिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप वाढलेला आहे. सदरहू भरती प्रक्रिया मुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यावर जो ताण पडलेला आहे तो कमी होईल. - पंकज गुल्हाने, जिल्हाध्यक्ष जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, अमरावती
राज्याच्या ग्रामविकास विभागाने झेडपी नोकरभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून १० टक्के पदे भरण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र २०१४ व त्यानंतर २०१९ च्या नोकर भरतीनंतर आता पदभरती होईल.ही पदभरती दरवर्षी रिक्त पदानुसार घ्यावी. - निळकंठ ढोके, जिल्हा सचिव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ