सेमाडोह येथे १० कावळे मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:25+5:302021-01-15T04:12:25+5:30
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अतिसंरक्षित सेमाडोह येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता १० कावळे मृतावस्थेत आढळून ...

सेमाडोह येथे १० कावळे मृतावस्थेत आढळले
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अतिसंरक्षित सेमाडोह येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता १० कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
विदेशी स्थलांतरित पक्ष्यांमुळे देशाच्या विविध भागांत पक्षी मृतावस्थेत आढळून येत असतानाच सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बँके पुढील परिसर अशा ठिकाणी हा प्रकार सकाळी उघडकीस आला. सिपना वन्यजीव विभागाचे सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. या घटनेने मेळघाटात विविध प्रजातीच्या पक्ष्यांवर संकट ओढवण्याची भीती वर्तविली जात आहे.
दवाखान्याला टाळे
बर्ड फ्लूमुळे सर्वत्र पशुवैद्यकीय अधिकारी दवाखाने सतर्क राहण्याचे आदेश दिले असताना सेमाडोह येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. दवाखान्याला टाळे होते. संबंधित चपराशी व कर्मचाऱ्यांनी मृत दोन कावळ्यांचे नमुने घेतले.
कोट
सेमाडोह येथे १० कावळे दगावले. घेतलेले नमुने पुणे येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. मागील काही घटना पाहता येथेही पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची नोंद आहे.
- विजय रहाटे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
अमरावती