दहा फटाकाविक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा
By Admin | Updated: November 1, 2016 00:14 IST2016-11-01T00:14:19+5:302016-11-01T00:14:19+5:30
नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी विनापरवाना व असुरक्षितरित्या फटाकाविक्री करणाऱ्या तब्बल दहा फटाका विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

दहा फटाकाविक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा
सीपींच्या आदेशाने कारवाई : वर्दळीच्या ठिकाणी फटाकाविक्री भोवली
अमरावती : नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी विनापरवाना व असुरक्षितरित्या फटाकाविक्री करणाऱ्या तब्बल दहा फटाका विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटाका व्यवसायिकांवर शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी फटाकाविक्री व साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्तांनी आदेश पारित करून फटाका व्यवसायिकांना सूचना दिल्या होत्या. तरी सुुद्धा आदेशांचे उल्लंघन करीत शहरातील काही ठिकाणी फटाका विक्रेत्यांनी सार्वजनिक रस्त्यावर फटाका दुकाने थाटून विक्री सुरूच ठेवली होती. शनिवारी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात पोलीस श्रीराम आमले यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एक महिला मौलाना आझाद मार्केटजवळ विनापरवाना फटाकाविक्री करताना आढळल्याने त्यांनी महिलेविरूद्ध कलम २८६, १८८ सहकलम ५ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ नुसार गुन्हा नोंदविला. गाडगेनगर पोलिसांनी राम मेघे कॉम्प्लेक्ससमोरील प्रशांत युवराज हंबर्डे, विलासनगरातील गौरव किशोर मातोली, नवसारीतील सोनू कैलास साहू, हर्षराज कॉलनीतील शेषराव लक्ष्मण गजभिये या फटाकाविक्रेत्यांवर कारवाई केली. वलगाव ठाण्याच्या हद्दीत पंकज पंजाब शिरभाते, शुभम दीपक बिजवे (२०,रा. आठवडी बाजार, पूर्णानगर) व ईमरान अली साबीर अली (२४,रा. साऊर) हे दोघे, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारा बाजारात अब्दुल हारून ऊर्फ अमिन अब्दूल सत्तार (५०,रा. रतनगंज) व बालाजी मंदिर परिसरात एक महिला विना परवाना फटाकाविक्री करताना आढळून आले. यासर्व फटाका विक्रेत्यांनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे व कलम १४४ चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई केली.
सार्वजनिक ठिकाणी फटाकाविक्री व साठवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही फटाका विक्रेते वर्दळीच्या ठिकाणी फटाका विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कलम १४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.