कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:57+5:302021-07-07T04:15:57+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम ...

कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान होत असल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाची प्रत्येक गावी भरीव अंमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्यात परिपूर्ण गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार धारणी तालुक्यात सावलीखेडा येथे आठवडी बाजारानिमित्त शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी लसीकरणासाठी आरोग्याची टीमही उपस्थित होती. दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंजनगाव सुर्जी तालुक्यात कापूसतळणी व भंडारज येथे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार, संजय गांधी योजनेसंदर्भातील कामकाज, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व धान्य वितरणाबाबतचे कामकाज, नैसर्गिक आपत्ती विभागातील अनुदान वाटप, घर पडझड, शेतकरी आत्महत्या व इतर विषय, रोजगार हमी योजनेबाबत कामकाज, तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावरील प्रलंबित कामकाज आदी कामे शिबिराच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत.