सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालये सुरू
By Admin | Updated: September 14, 2014 23:45 IST2014-09-14T23:45:45+5:302014-09-14T23:45:45+5:30
१० पंचायत समिती सभापती-उपसभापतींची रविवारी असलेली निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चौदाही तहसील कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरु होती.

सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालये सुरू
निवडणुकीची लगबग : महसूल यंत्रणा लागली कामाला
अमरावती : १० पंचायत समिती सभापती-उपसभापतींची रविवारी असलेली निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चौदाही तहसील कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र रविवारी शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीच्यादृष्टीने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी जिल्ह्यातील चौदाही तहसील कार्यालये व निवडणूक कक्ष सुरु ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव व धारणी वगळता अन्य १० तालुक्यांत रविवारी १४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती, सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी तहसीलदार तसेच नायब तहसीलदार पीठासीन असल्याने तेदेखील कार्यालयात उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने चार तालुके वगळता उर्वरित पंचायत समिती कार्यालयेदेखील सार्वजनिक सुटीच्या दिवशी रविवारी सुरुच होती.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली आहे. प्रत्यक्षात निवडणुकची अधिसूचना २० सप्टेंबरला प्रसिध्द होत असल्याने आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणीसुध्दा त्याच दिवसापासून होणार आहे. नामांकन प्रक्रिया मतदारसंघाच्या मुख्यालयी राबविली जाणार असल्याने मतमोजणी प्रक्रियेपर्यंत सर्व तहसील कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. यामुळे तहसील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे. निवडणुकीच्या कामकाजात कोणतीच हयगय करता येणार नाही. (प्रतिनिधी)