दिल्लीच्या पथकाकडून शहरात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:25+5:302021-03-04T04:21:25+5:30
अमरावती : कोरोनाग्रस्तांचे ‘हॉट स्पॉट’ असलेल्या परिसराला ‘कंटेनमेंट झोन’ घोषित करून तेथे घरोघरी तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने ...

दिल्लीच्या पथकाकडून शहरात पाहणी
अमरावती : कोरोनाग्रस्तांचे ‘हॉट स्पॉट’ असलेल्या परिसराला ‘कंटेनमेंट झोन’ घोषित करून तेथे घरोघरी तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने विभागातील कोरोना संसर्गाच्या वाढीची कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्रीय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली. यामधील सहसचिव विनायक यांनी अमरावती शहराला भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाशी चर्चा केली.
विनायक यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे, डॉ. विशाल काळे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. अकोलाचे जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांकडून तेथील माहितीही त्यांनी घेतली. बैठकीनंतर त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन कोरोनाग्रस्तांसाठी असलेल्या सुविधांची पाहणी केली. यानंतर त्यांनी शहरातील श्रीकृष्णपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.
बॉक्स
अंंमलबजावणी यंत्रणांमध्ये समन्वय हवा
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत गर्दी टाळणे सर्वांत आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी कशी कमी करता येईल, यादृष्टीने अंमलबजावणी व्हावी. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलीस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी टीम वर्क व्हावे, असे निर्देश पथकातील अधिकाऱ्यांनी दिले.