आदिवासींना टरबूज-खरबूज शेतीचे धडे
By Admin | Updated: May 7, 2015 00:04 IST2015-05-07T00:04:42+5:302015-05-07T00:04:42+5:30
मेळघाटात वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक सेवा देणाऱ्या रवी कोल्हे, स्मिता कोल्हे कुटुंबाने येथे आधुनिक शेती व्यवसायात ...

आदिवासींना टरबूज-खरबूज शेतीचे धडे
मेळघाटात प्रयोग : कोल्हे कुटुंबीयांनी फुलविली आधुनिक शेती
धारणी : मेळघाटात वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक सेवा देणाऱ्या रवी कोल्हे, स्मिता कोल्हे कुटुंबाने येथे आधुनिक शेती व्यवसायात भरारी घेतली. उन्हाळ्यातील चवदार गोड फळ टरबूज व खरबूजची शेती करून आदिवासी शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला. एकरी दोन लाख रुपयांचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. वैद्यकीय व सामाजिक सेवेत नावलौकिक मिळविणारे रवी कोल्हे, स्मिता कोल्हे यांचे लवादाजवळील कोलूपूर येथे शेत आहे. शेतीत ३ महिन्यांतच चवदार फळ टरबूज आणि खरबूजाची शेती फुलविली. यातून आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय आदिवासी शेतकऱ्यांच्या नजरेत आणून दिला. कोल्हे दाम्पत्यांनी बियाण्यांची योग्य निवड स्थानिक हवामान, जमिनीची पोत, पाण्याच्या घसरत्या पातळीच्या अनुषंगाने शेतात पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले. एक प्रयोग म्हणून व्यावसायिक स्तरावर मुस्कान नावाच्या खरबूज तर मेघना नामक टरबुजाची पेरणी करुन प्लास्टिकचे पांघरुन घालण्यात आले. मेळघाटात विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब, अवकाळी पाऊस, गारपीट वादळ यांना तोंड देत त्यांनी टरबूजाची शेती यशस्वीपणे केली आहे. एकरी खर्च ६० हजार रुपये लागला असून १२ टन उत्पादन घेतले. मेळघाटात मालाला मागणी कमी असली तरी १८ रुपये प्रतिकिलो दराने हा माल उत्तरप्रदेशात विकला जात आहे. मेघना नामक फळ काळेशार आहे. मुस्कानचे आतून रंग केशरी व चवीने गोड आहे. दोन्ही उत्पादनात १७ टक्के साखरेचे प्रमाण आहे. मेळघाटात परंपरागत धान्याची शेती तोट्यात जात असल्याने रवी कोल्हे यांनी टरबूज व खरबूज फळाच्या शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखविला.
ग्लोबल वार्मिंगच्या काळात मेळघाटातही निसर्गाने अवकृपा केली. कमी विद्युतदाब, विजेचा लपंडाव, २० तासांचे भारनियमन या कारणांमुळे धान्याची शेती करणे तोट्यात येत आहे. यासाठी ३ महिन्यांच्या कालावधीत टरबूज व खरबुजाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेता आले. यासंधीचा आदिवासी शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल.
-डॉ. रवी कोल्हे, समाजसेवक, धारणी