देवमाळीत भरदिवसा फोडले शिक्षकाचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:26+5:302021-08-22T04:15:26+5:30
पान ३ लीड लाखोंचा ऐवज पळविला, मुलीच्या प्रवेशासाठी गेले होते अकोल्याला परतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी क्षेत्रात भरदिवसा ...

देवमाळीत भरदिवसा फोडले शिक्षकाचे घर
पान ३ लीड
लाखोंचा ऐवज पळविला, मुलीच्या प्रवेशासाठी गेले होते अकोल्याला परतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी क्षेत्रात भरदिवसा चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडले. येथून १७० ग्रॅम सोन्याचे दागिने, तीस हजार रुपये रोख रक्कम आणि पाच व दोन रुपयांची शेकडो नाणी चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांच्या लेखी तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला असला तरी बाजारमूल्यानुसार सोन्याचे दागिनेच लाखोंच्या घरात आहेत. या घटनेने जुळे शहर पुन्हा हादरले आहे.
रतन मोरे (४७, रा. महालक्ष्मी टाऊनशिप, देवमाळी, परतवाडा) हे मोठ्या मुलीच्या प्रवेशाकरिता २० ऑगस्टला सकाळी अकोला येथे पत्नीसह गेले होते. मुलीची ॲडमिशन करून सायंकाळी सव्वा पाच वाजता ते आपल्या घरी पोहोचले. त्यांना घराच्या मुख्य दरवाजाच्या कोंडा तुटलेला आणि दरवाजा उघडा दिसला. बेडरूममध्ये असलेल्या अलमारीचे लोकर तोडून अज्ञात चोरट्यांनी दहा लाखांच्या मुद्देमाल नेल्याचे रतन मोरे यांनी घटनेच्या अनुषंगाने स्पष्ट केले.
रतन मोरे यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची फिर्याद नोंदविली. ४२ ग्रॅमचे मंगळसूत्र, ३० ग्रॅमच्या दोन बांगड्या, २५ ग्रॅमचे दोन गोफ, १५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, १८ ग्रॅमचा एक नेकलेस, १६ ग्रॅमचे कानातले जोड, पाच ग्रॅमची डोरले मण्याची पोत, १२ ग्रॅमचे कानातले वेल, पाच ग्रॅमच्या तीन नथ असे एकूण १६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. अडीच लाखांचे दागिने व रोख ३० हजार असा एकूण २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. पण यात काहीही हाती लागले नाही. दाखल ठसेतज्ज्ञांनाही अज्ञात व्यक्तीचे ठसे घटनास्थळावर मिळाले नाहीत.
--------------
आणखी दोन घरफोडी
परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अन्य ठिकाणीही चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही यादरम्यान चर्चेत आला. शहरासह परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसा अज्ञात चोरटे खुलेआम घरफोड्या करीत आहेत.
-----------------
कुत्र्याच्या भुंकण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष
घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी घटनास्थळी असलेल्या कुत्र्याला मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्या कुत्र्याला उचलून आवारभिंतीवरून बाहेर फेकले. कुत्रा सतत भुंकत राहिला. पण, त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
--------------