बुधवारी राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार
By Admin | Updated: November 17, 2015 00:21 IST2015-11-17T00:21:56+5:302015-11-17T00:21:56+5:30
स्व. विजय नकाशे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसह विविध समस्यांच्या निपटाऱ्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे.

बुधवारी राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार
विविध समस्यांचा समावेश : मुंबईत धरणे, अमरावतीत समन्वय बैठक
अमरावती : स्व. विजय नकाशे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसह विविध समस्यांच्या निपटाऱ्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. बुधवार १८ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये १८ शिक्षक संघटनाचा समावेश असलेल्या समन्वय समितीची बैठक होत आहे. तर आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात ‘धरणे आंदोलन करणार आहे. एकंदरीतच विजय नकाशे यांच्या क्लेशदायी आत्महत्येच्या घटनेनंतर शिक्षण वर्तुळात खळबळ माजली आहे आणि अशैक्षणिक कामांचा विरोध म्हणून राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
समन्वय समितीची बैठक
‘नको ती अशैक्षणिक कामे’ असा एल्गार पुकारत राज्यभरातील शिक्षक संघटना समान न्यायासाठी एकत्र आल्या आहेत. १८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत राजापेठ स्थित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. अमरावतीत होणाऱ्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे काढून घेत त्यांना फक्त अध्यापन करु द्या, अशी आग्रही मागणी या बैठकीतून करण्यात येणार आहे. समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, म. रा. शिक्षक सेना, पुरोगामी शिक्षक संघटना शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), शिक्षक संघ, ग्रेड मुख्याध्यापक संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक सभा, आदिवासी शिक्षक सभा यासह राज्यभरातील लहान-मोठ्या १८ शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यात एकत्र आले आहेत. शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत मंथन होणार आहे. यातच पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार आहे.
‘डिसीपी’ योजनेतील
हिशेब द्या
परिभाषित अंशदायी निवृत्ती योजना ‘डीसीपीएस’ मधील हिशोब मिळवा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय भवनासमोर लाक्षणिक आंदोलन करणार आहे. १८ नोव्हेंबरला होत असलेल्या या आंदोलनात ५०० पेक्षा अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत. १ नोव्हेंबर २००५ नंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्यांच्या वेतनातून कपात झालेल्या रकमांची विवरणपत्रे किंवा जमा रकमांचा हिशेब देण्यात आला नाही. सदर कपातीची विवरणपत्रे देण्यासाठी केलेल्या मागणीकडे होत असलेल्या सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करीत असल्याचे माहिती शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. (प्रतिनिधी)