शिक्षकांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच
By Admin | Updated: March 18, 2016 00:13 IST2016-03-18T00:13:11+5:302016-03-18T00:13:11+5:30
विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार एकवटलेत. जोवर शासन मागण्या मान्य करीत नाहीत, ...

शिक्षकांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच
मागण्यांची पूर्तता करा : शेखर भोयर यांची मागणी
अमरावती : विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार एकवटलेत. जोवर शासन मागण्या मान्य करीत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. शासनाने शिक्षकांवर सतत १५ वर्षे हेतुपुरस्सर अन्याय केल्याची खंत यावेळी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण, अकोला येथील आ. पिचड, नाशिक येथील आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे, रायुकाँचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी बुधवारी बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. सर्व घोषित शाळांना अनुदान, अघोषित शाळांना घोषित करून अनुदानाबाबत विधिमंडळाच्या आर्थिक अधिवेशनात घोषणा करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. या धर्तीवर शासनाला जाब विचारला जाणार आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आ. गाणार, महाराष्ट राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे तात्यासाहेब म्हसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यादव शेळके, अमित प्रसाद, प्रवीण पारिसे, पुंडलिक रहाटे आदी उपस्थित होते. अनुदानाची व पोटापाण्याची ही लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विधिमंडळात आश्वासनानुसार रीतसर घोषणा न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी शेखर भोयर यांनी दिला. (प्रतिनिधी)