गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या
By Admin | Updated: February 27, 2015 00:17 IST2015-02-27T00:17:51+5:302015-02-27T00:17:51+5:30
चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत शिक्षिकेने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या
अचलपूर : चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत शिक्षिकेने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सुशीला प्रेमलाल भिलावेकर (३७) रा. ऋषीराज कॉलनी कांडली असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या चिखलदरा पं.स. अंतर्गत येणाऱ्या हत्तीघाट येथील शाळेवर कार्यरत होत्या. पती प्रेमलाल बाबू भिलावेकर हेसुध्दा डोमा येथील शाळेवर शिक्षक आहेत. ते दोन दिवसांपासून शालेय कामासाठी परतवाडा (कांडली) येथे घरी आले होते. पत्नी सुशीला आठ वर्षीय मुलगी व भाची सोबत राहत होती. नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्थित असताना मध्यरात्री मृत शिक्षिका सुशीला उठल्या लघुशंकेसाठी गेल्या. २.३० वाजतादरम्यान आग आल्याने त्यांचे पती जागे झाले. पत्नीला पाहण्यास गेले असता त्या आढळल्या नाही. बाहेरुन बंद करण्यात आले होते. तोच प्रकार झोपलेल्या खोलीचा होता.
दरोडेखोर घुसल्याची शंका
घरात बंद असलेले पती प्रेमलाल भिलावेकर यांनी भ्रमणध्वनीवर शेजारी राहणारे जावई महादेव कास्देकर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी परतवाडा पोलिसांना तत्काळ कळविले. घरात चोर घुसले असावे, असा संशय असताना घटणास्थळी दार उघडताच धक्कादायक चित्र होते. पंख्याला नायलॉन दोरीने सुशीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
कारण अज्ञातच
पती-पत्नीमध्ये १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनात कुठल्याच प्रकारचा वाद पहावयास मिळाले नसल्याचे खुद्द भिलावेकर यांच्या सासऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर प्रकरणाचा तपास केला जाणार असून प्रमथदर्शी ठोस असे काही पुरावे आढळून आले नसल्याचे परतवाड्याचे ठाणेदार गिरीश बोबडे यांनी सांगितले. केवलराम काळे, पं.स. सभापती दयाराम काळे, शिक्षकांनी भेट देऊन सांत्वना केली.