जारिदा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षक बेपत्ता

By Admin | Updated: July 12, 2015 00:31 IST2015-07-12T00:31:59+5:302015-07-12T00:31:59+5:30

तालुक्यातील जारिदा येथील शासकीय आश्रम शाळेचा भोंगळ कारभार दरवर्षीप्रमाणे पुन्हा उघडकीस आला आहे.

Teacher missing students in Jardida Ashramshala | जारिदा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षक बेपत्ता

जारिदा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षक बेपत्ता

आदिवासी विभागाचा कारभार : गावकऱ्यांनी केला शाळेचा पंचनामा
नरेंद्र जावरे चिखलदरा
तालुक्यातील जारिदा येथील शासकीय आश्रम शाळेचा भोंगळ कारभार दरवर्षीप्रमाणे पुन्हा उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकही शाळेत पोहोचले नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत शाळेचा बुधवारी पंचनामा केला. परिणामी आदिवासी विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मेळघाटातील आश्रमशाळा उघडणार केव्हा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बुधवारी ८ जून रोजी जारिदा येथील आश्रमशाळेचा भोंगळ कारभार पाहता संतप्त गावकऱ्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली. राज्यभरातील शाळा २६ जून रोजी उघडल्या असताना जारीदा आश्रमशाळेत विद्यार्थी मोजकेच आले होते. तसेच शिक्षक अनुपस्थित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील पाच वर्षांपासून सतता वादग्रस्त ठरलेली जारिदा आश्रमशाळा याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत या आश्रमशाळेत आदिवासी मुले-मुली निवासी असतात. एक हजारांच्या जवळपास विद्यार्थी निवासी असल्यामुळे त्याच्या भोजन व निवासाची व्यवस्था आदिवासी विभागामार्फत करण्यात येते. मोठ्या प्रमाणात अनुपस्थित विद्यार्थ्यांना नंतर उपस्थित दाखवून त्यांच्या सोयी सुविधा साहित्य जेवणासाठी लागणारे किराणा साहित्य खुल्या बाजारात संबंधित शिक्षक खुल्या बाजारात विकत असल्याचे या अगोदर उघडकीस आले आहे.
जारिदा आश्रम शाळेत बुधवारी उपसरपंच दिनेश आठोले, अरविंद बिसंदरे, राजकमल सेलुकर, एस.डी. पाटणकर, जीवन मोरे, गोविंद पाटणकर, प्रशांत पंडोले, मनोज पाटणकर, एम.एम. बिसंदरे, पोलीस पाटील जी.बी. जामूनकर, मोहन बिसंदरे, श्याम नसागोले, सुभाष धुर्वे, सुरेश उईके, मनोज बेठेकर आदी मोठ्या प्रमाणात गावकरी, पालकांनी शाळेची पाहणी करुन पंचनामा केला. याप्रकरणात काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

सहायक प्रकल्प अधिकारी उपस्थित
जारिदा आश्रमशाळेचा भोंगळ कारभार पाहता बुधवारी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी पेढेकर यांनी सुध्दा जारिदा येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची पाहणी केली असता. मोठ्या प्रमाणात शिक्षक बेपत्ता आढळून आले, मोजकेच विद्यार्थी वसतिगृहात होते. शिक्षकांचे दैनिक टाचण आदी सर्व अपूर्ण अवस्थेत आढळून आले. यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क होऊ शकला नाही.
नेहमीचाच प्रकार
आदिवासी विभागामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी केला जातो. परंतु जारिदा आश्रमशाळा दरवर्षी वादग्रस्तच ठरली आहे. माजी माहिती व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनीसुध्दा तीन वर्षांपूर्वी या शाळेचा पंचनामा केला होता. तर तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीसुध्दा गतवर्षी भेट दिली होती. जारिदा आश्रम शाळेचा बेपत्ता शिक्षक व विद्यार्थी सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

पत्रकारांना मज्जाव
आपले कार्य उघडकीस येऊ नये यासाठी येथील शिक्षक एच.सी. कुहीकर व एच.जी. भोंगे यांनी पत्रकारांना हुसकून लावल्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकारी सुध्दा आमचे काही एक करु शकत नसल्याचा तोरा होता.

गावकऱ्यांसोबत शाळेतील प्रकाराचा पंचनामा केला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे कळविले. आता वरिष्ठ याप्रकरणात काय कारवाई करणार हे पाहायचे आहे.
-दिनेश आठोले,
उपसरपंच, जारिदा.

Web Title: Teacher missing students in Jardida Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.