दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा

By Admin | Updated: October 23, 2016 00:30 IST2016-10-23T00:30:13+5:302016-10-23T00:30:13+5:30

देशभर पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी युवकांनी पेटून उठत दिशाभूल करणाऱ्या व गरीबांची थट्टा उडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

Teach a lesson to misleading rulers | दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा

दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा

मुकुल वासनिक : आता एकवटले काँग्रेसजन
परतवाडा : देशभर पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी युवकांनी पेटून उठत दिशाभूल करणाऱ्या व गरीबांची थट्टा उडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसचा हात मजबूत करण्याचे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले. ते स्थानिक रंगोली लॉन येथे शनिवारी आयोजित अचलपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, केवलराम काळे, संजय खोडके, किशोर बोरकर, राजेंद्र गोरले, सतीश हाडोळे गिरीष कराळे, दयाराम काळे, सोनाली देशमुख, हरिश्र्चंद्र मुगल, राजाभाऊ टवलारकर, कैलास आवारे, पप्पू चंदनानी, भाष्कर हिरडे, मधुकर हुड, गौरव काळे, साजीद फुलारी, वासंती मंगरुळे, हरिदास नाथे, अरुणाताई गोरले यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वासनिक म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांनी कर्जमाफी व अर्धे वीज बिल माफ करेल. यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केवळ काँग्रेस सरकारनेच दिली. तर गोरगरीबांसाठी स्वस्त धान्य योजना राबविली. देशाचा विकास होत असताना सर्वसामान्य व गोरगरीबांना सुद्धा विकास झाला पाहीजे हेच धोरण काँग्रेस शासनाने ठेवले होते. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देणाऱ्या मोदी सरकारने अडीच वर्षात केवळ १ लाख ३४ हजार युवकांना रोजगार दिला. खोटी आश्वासने देणाऱ्या याच शासनाने दुसरीकडे उद्योजकांच्या १ लाख १४ हजार कोटी रुपये माफ केले. तेव्हा युवकांनी खांद्याला खांदा लावून सर्वच स्तरावर खोटारड्यांचे राजकारण उघडे पाडीत पेटून उठण्याची गरज निर्माण झाली असल्याचेही मुकुल वासनिक यावेळी म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)

स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय - ठाकरे
स्थानिक नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुकीसंदर्भात जिल्हास्तरावर राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षांसोबत युती करायची किंवा नाही, यासंदर्भाचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यभर देण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये योग्य तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार असल्याचे विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, काँग्रेसच्या हातात सत्ता द्या कारण आताची सत्ता कुणाच्या हातात आहे हेच कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांचे सचिव ऐकत नाही, तर मंत्र्यांचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. जनतेमध्ये रोष आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याचे व या अचलपूर नगरीत त्यांचा हृदयसत्कार केल्याबद्दल त्यांनी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले.

एकजुटीने लढा द्या - देशमुख
येत्या निवडणुकांमध्ये मागचे उणे सर्व विसरून एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. निवडणुकीत सत्ता असताना सोबत असणारे सत्ता जाताच मागच्या रस्त्याने निघून जातात. अशांना त्यांची जागा दाखवून खऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसह इतर निवडणुकांमध्ये काहींनी केलेली दगाबाजी याचा आवर्जून खरपूस समाचार घेतला. आ. वीरेंद्र जगताप, केवलराम काळे आदींचीसुद्धा यावेळी भाषणे झालीत. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण काँग्रेसमय वातावरणाने कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचे नवचैतन्य दिसून आले.

माणिकराव न थकणारा नेता
विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व मी मागील अनेक वर्षांपासून सोबत काम करीत आहे. सत्ता असो की नसो सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे पायाला भिंगरी बांधून सतत प्रवासात लोकांपर्यंत धावणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही गंभीर काळात डोक्यावर बर्फ ठेवून शांततेने ऐकण्याची क्षमता वाखाणण्याजोगी असल्याचे मुकुल वासनिक यांनी माणिकराव ठाकरे यांच्या सत्कारावर गौरवोद्गार काढले.

Web Title: Teach a lesson to misleading rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.