आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव सभागृहात फेटाळला
By Admin | Updated: August 18, 2015 00:12 IST2015-08-18T00:12:08+5:302015-08-18T00:12:08+5:30
अतिरिक्त आणि नवीन बांधकामावर कर आकारणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ठरविलेल्या करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळून लावला

आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव सभागृहात फेटाळला
सहापट नव्हे दुप्पट वसूल होणार : जुलै महिन्याच्या ठरावावर सदस्य कायम
अमरावती : अतिरिक्त आणि नवीन बांधकामावर कर आकारणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ठरविलेल्या करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच सहापट नव्हे तर दुप्पट कर आकारणी करण्याचा निर्णय महापौर चरणजित कौर नंदा यांनी सोमवारी घेतला. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली सर्वसाधारण सभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात भाग घेतला. दरम्यान आयुक्तांकडून आलेल्या प्रशासकीय विषय क्रमांक ७० अन्वये महापालिका क्षेत्रातील नवीन आणि अतिरिक्त बांधकामाचे सर्वेक्षण करुन मालमत्ताकराच्या आकारणीबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीच्या प्रस्तावासंदर्भात २० जुलै रोजी सभेने पारित के लेल्या ठराव क्र. १२६, १२८, १२९ नुसार करवाढीबाबत आयुक्तांनी बांधकामाच्या चौरस फुटानुसार ठरविलेल्या धोरणावर सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या महिन्यात २० जुलै रोजी नवीन व अतिरिक्त बांधकामावर दुप्पट कर आकारणीचा निर्णय सभागृहाने घेतला असताना तो नव्याने सभागृहात आणण्याचे कारण काय, असा सवाल विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, दिगंबर डहाके, तुषार भारतीय, प्रकाश बनसोड, प्रशांत वानखडे, विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, प्रदीप बाजड, बाळासाहेब भुयार, मिलिंद बांबल, संजय अग्रवाल, प्रदीप दंदे, अजय गोंडाणे, विजय नागपुरे, अंबादास जावरे आदींनी उपस्थित केला.
सर्वच घरांची तपासणी होणार- आयुक्त
तुषार भारतीय, दिगंबर डहाके यांनी आता घरमोजणी मोहीम का थांबली? सामान्यांनाच वेठीस धरणार काय? आमदार, खासदारांची घरे मोजणीतून मुक्त करणार काय? अशा प्रश्नांची सरबत्ती केली असता आयुक्त गुडेवार यांनी सर्वच घरांची मोजणी करणार. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली जात असून कोणतेही घर मोजणीतून सुटणार नाही, असे उत्तर दिले.
दादासाहेब गवर्इंचे तैलचित्र लागणार
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांना सोमवारी सभेच्या प्रारंभीच श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी विलास इंगोले यांनी दादासाहेब गवई यांचे तैलचित्र स्थानिक नेहरु मैदान येथील शहीद स्मारकाच्या हॉलमध्ये लावण्याचा प्रस्ताव मांडला. शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्याचेही आवर्जून नमूद केले. या प्रस्तावाला दिगंबर डहाके, अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे, अजय गोंडाणे, राजेंद्र तायडे, कांचन गे्रसपुंजे, विजय नागपुरे, दीपमाला मोहोड आदींनी अनुमोदन केले. महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
गढूळ पाण्याचा विषय तापला
जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा महापालिकेच्या आमसभेत चर्चिल्या गेला. पाणी शुध्दीकरण होत नसल्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री आणि भेसळीबाबत प्रदीप बाजड यांनी भूमिका मांडली. पाणी नमुन्यांच्या तपासणीवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मजिप्राच्या श्वेता बॅनर्जी यांनी मात्र जलशुध्दीकरण होत असल्याचे सांगितले. पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दिगंबर डहाके यांनी ‘ट्री गार्ड’चा विषय मांडला. हा मुद्दा आठवडाभरात, निकाली काढला जाईल, असे सांगितले.