५२ ग्रामपंचायतींत बुडतो बीएसएनएल टॉवरचा कर
By Admin | Updated: July 19, 2015 00:25 IST2015-07-19T00:25:51+5:302015-07-19T00:25:51+5:30
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८४३ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ११३ ग्रामपंचायत हद्दीत बीएसएनएलचे टॉवर आहेत.

५२ ग्रामपंचायतींत बुडतो बीएसएनएल टॉवरचा कर
उदासीनता : कराची आकारणी करण्यात कुचराई
जितेंद्र दखणे अमरावती
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८४३ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ११३ ग्रामपंचायत हद्दीत बीएसएनएलचे टॉवर आहेत. यापैकी ५२ ग्रामपंचायतींनी या टॉवरवर कर आकारणी लागू केली नाही. परिणामी या हजारो रूपयांचा कर नाहक बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सुमारे ११३ गावांत भारत संचार निगमने आपल्या मालकीचे टॉवर उभारले आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यात ६, वरूड १०, अमरावती ७, चांदूर बाजारमध्ये ११, अचलपूर तालुक्यात ८, चांदूररेल्वे ७, नांदगाव खंडेश्र्वर ११, भातकुली ९, धारणी २, अंजनगाव सुर्जी ९, धामनगाव रेल्वे १४, चिखलदरा १, दर्यापूर ५, आणि मोर्शी ९ याप्रमाणे बीएसएनएल टॉवर काही गावांमध्ये उभारले आहेत. यापैकी निवडकच ग्रामपंचायतींनी या टॉवरवर कर आकारणी केली आहे. यामध्ये केवळ ५५ ग्रामपंचायतींनीच भारत संचार निगमकडून कर आकारणीची रक्कम वसुलीसाठीची कारवाई ग्रामपंचायतींनी केली आहे. मात्र यापैकी २४ टॉवरचाच कर भरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. उर्वरित ग्रा.पं.च्या हद्दीतील कर वसूल केलाच जात नाही. बीएसएनएल कंपनीसुध्दा हा कर भरत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने या प्रकारावर पडदा पाडला जात आहे.
या गावांत कर आकारणीच नाही
तिवसा - वऱ्हा, कौंडण्यपूर, मार्डी, गुरूदेवनगर, शिवणगाव व वरूडमधील बेनोडा, ढगा, गाडेगाव, जरूड, लोणी, बारगाव, राजुरा बाजार, टेभुरखेडा, मांगरूळी, अमरावती -नांदगाव पेठ, मलकापूर, चांदूरबाजार -धानोरा, ब्राम्हणवाडा, घाटलाडकी, सोनोरी, मासोद, शिरजगाव बंड, जवळा, शिरजगाव कसबा, करजगाव, बेलोरा, अचलपूर मधील रासेगाव, काकडा, धामनगाव गढी, परसापूर, पथ्रोट, बोपापूर, खैरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, नांदगाव खंडेश्र्वरमधील दहिगाव, शेलुगुंड, नांदगाव, शिवरा, मांजरी म्हसला, भातकुली तालुक्यातील गणोजा देवी, खोलापूर, वाठोडा शुकलेश्र्वर, खारतळेगाव, साऊर, आसरा,अंजनगाव सुर्जी मधील कापुसतळणी, धामनमाव रेल्वे मधील जुना धामनगांव , मलातपूर,निभोंरा बोळखा, तळेगाव दशासर, वसाड, मोर्शी खेड, हिवरखेड,निंभा, रिध्दपूर, अंबाडा, राजूरवाडी, अडगाव या गावांचा समावेश आहे.
ज्या ग्रामपंचयात क्षेत्रात बिएसएनएल चे टॉवर आहेत मात्र त्यावर ग्रामपंचायतीनी कर आकारणी केली नसेल अशा सर्व ग्रामपंचायतींना शासनाच्या नवीन कर आकारणी धोरणानुसार कर आकारला जाईल.
-जे.एन आभाळे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग.