सहायक आयुक्तांवर कर वसुलीची मदार
By Admin | Updated: March 5, 2017 00:15 IST2017-03-05T00:15:00+5:302017-03-05T00:15:00+5:30
चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे २५ दिवस शिल्लक असताना महापालिका यंत्रणेसमोर १८ कोटींचा मालमत्ता कर वसुलण्याचे आव्हान उभे टाकले आहे.

सहायक आयुक्तांवर कर वसुलीची मदार
१८ कोटींचे लक्ष्य : बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई
अमरावती : चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे २५ दिवस शिल्लक असताना महापालिका यंत्रणेसमोर १८ कोटींचा मालमत्ता कर वसुलण्याचे आव्हान उभे टाकले आहे. कर वसुलीची मदार करवसुली लिपिकांसह सहायक आयुक्तांवर असून पाचही सहायक आयुक्तांना आता अधिकचे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
दोन ते अडीच महिन्यांचा मोठा कालवाधी निवडणूक प्रक्रियेत गेल्याने करवसुलीवर परिणाम झाला. ही वसुली अक्षरश: या काळात ठप्प झाली. त्यामुळे आता १०० टक्के मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिमेसह कारवाईचा दंडुका चालणार आहे.
उत्तर झोन, मध्ये झोन, पूर्व झोन, दक्षिण झोन आणि पश्चिम झोन या पाचही प्रशासकीय झोनच्या कार्यक्षेत्रातून महापालिकेस सुमारे ४१.५९ कोटी रूपये मालमत्ता कर अपेक्षित आहे. गतवर्षी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराची वसुली ३५ कोटींवर स्थिरावली होती. त्यामुळे २ मार्चपर्यंत तिजोरीत आलेले २३.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत ही यंत्रणेला १२ कोटी रुपये ३१ मार्च २०१७ पर्यंत संकलित करायचे आहे. त्यासाठी १० मार्च पर्यंत झोन स्तरावरून मोठ्या थकबाकीदारांचा याद्या मागविल्या जात असून त्यातील मोठ्या थकबाकीदारांवर पुरेषा संधीनंतर थेट जप्तीची कारवाई केल्या जाईल.
सहायक आयुक्तांना तसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. निवेदिता घार्गे आणि योगेश पीठे हे सहायक आयुक्त वगळता मंगेश साटाणे आणि सोनाली यादव यांच्या झोनचा वसुली टक्का माघारल्याने त्यांनाही आता अधिक वेगाने मालमत्ताकर वसुलीकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मालमत्ता करावर महापालिकेची आर्थिक मदार आहे. त्यामुळे उर्वरित २४-२५ दिवसांत करवसुलीचा टक्का १०० टक्केपर्यंत नेण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)