कर वसुलीस ‘कोरोना’चा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:56+5:30
महानगरात असलेल्या एक लाख ४२ हजार मालमत्तांपासून महापालिकेला ४३ कोटी ४३ लाख ५० हजारांचा महसूल मिळतो. सद्यस्थितीत पाचही झोनमध्ये २३ मार्चपर्यंत २८ कोटी ९९ लाख १७ हजार १४३ रुपयांची वसुली झालेली आहे. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर या विभागाद्वारा थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस, जप्तीच्या नोटीस, टॉवर सील करणे यासारखे आदी प्रकार सुरू केले होते.

कर वसुलीस ‘कोरोना’चा डंख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या यंत्रणेला आता ‘कोरोना’चा ग्रहण लागले आहे. वसुलीसाठी सील केलेले टॉवरही या आपत्तीत मुक्त करावे लागले. त्यात आता कर्फ्युचाही मोठा फटका या विभागाला बसला आहे. गतवर्षी या काळात रोज ४० ते ५० लाख वसुली व्हायची. ती आता निरंक असल्याने वाढीव तरतुदींना कात्री लावावी लागणार असल्याचे वास्तव आहे.
महानगरात असलेल्या एक लाख ४२ हजार मालमत्तांपासून महापालिकेला ४३ कोटी ४३ लाख ५० हजारांचा महसूल मिळतो. सद्यस्थितीत पाचही झोनमध्ये २३ मार्चपर्यंत २८ कोटी ९९ लाख १७ हजार १४३ रुपयांची वसुली झालेली आहे. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर या विभागाद्वारा थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस, जप्तीच्या नोटीस, टॉवर सील करणे यासारखे आदी प्रकार सुरू केले होते. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या व यामध्ये गर्दी जमू नये व घराबाहेर निघू नये, ही प्रमुख उपाययोजना आहे. या आठवड्यात तर जमावबंदी व नंतर संचारबंदी लागू केल्याने मालमत्ता कर वसुलीसाठी मर्यादा आली आहे. त्यामुळे हा विभाग ठप्प झालेला आहे.
शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. मात्र, कार्यालयात केवळ पाच टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे कामकाज ठप्प आहे. याव्यतिरिक्त लाखोंच्या कर्जवसुलीसाठी शहरात २० वे मोबाईल कंपन्यांचे टॉवर सहायक आयुक्तांनी सील केले होते. मात्र शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा व नंतर जमावबंदी व संचारबंदी लागू झाल्यानंतर हे टॉवर मोकळे करावे लागल्याने पुन्हा वसुलीस फटका बसला आहे.
ऑनलाईन पद्धतीने करावा भरणा
शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने वसुली पथक नागरिकांकडे वसुलीसाठी जाऊ श्कत नाही. कर भरण्यासाठी नागरिक बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिक थकबाकीदार होत आहेत. यासाठी ऑनलाईन कराचा भरणा नागरिक करु शकतात. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करण्याचे आवाहन करनिर्धारण व कर संकलन अधिकारी महेश देशमुख यांनी केले आहे.