नियोजनाअभावी टाकरखेडा पाण्यात
By Admin | Updated: July 26, 2015 00:45 IST2015-07-26T00:45:07+5:302015-07-26T00:45:07+5:30
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका या गावाला नियोजनाअभावी सहन करावा लागला. मुख्य मार्गावर पाणी साचले,

नियोजनाअभावी टाकरखेडा पाण्यात
शेतात शिरले पाणी : जिल्हा परिषद शाळेसमोर साचला तलाव
टाकरखेडा संभू : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका या गावाला नियोजनाअभावी सहन करावा लागला. मुख्य मार्गावर पाणी साचले, शेतातही नाल्याचे पाणी शिरले आहे. इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषद शाळेसमोर पाण्याचा तलाव साचल्याने विद्यार्थ्यांना डबक्यातून ये-जा करावे लागत आहे.
तब्बल एक महिन्याच्या दांडीनंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभावाचा फटका गावकऱ्यांना बसला. छोट्या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली. आष्टी ते टाकरखेडा या मुख्य रस्त्यावर दोन ते तीन फूट इतके पाणी वाहत होते. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याच्या नाल्या काढणे हे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे काम आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्याची सुविधा नसल्याने काही ठिकाणी पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर पाण्याचा मोठा तलाव या संततधार पावसामुळे तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा मार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनादेखील चांगलीच कसरत करावी लागली.